अमरावती

अमरावती येथे आयटी पार्क उभारणार

महासागर प्रतिनिधी अमरावती/अकोला/चंद्रपूर, दि. ४ : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना रविवारी अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले. पंचवटी चौकापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप साईनगर येथील साईमंदिराजवळ झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अमरावती हे अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, पुढल्या काळात अमरावतीतील तरुणांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) गुंतवणूक आणली जाईल, अशी घोषणा पत्रकारांशी बोलताना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावती आणि संपूर्ण पश्चिम विदर्भामध्ये डॉ. पंजाबराव देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणाचा प्रसार केला. आता अमरावतीत आयटी क्षेत्रातील उद्योग आले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अमरावतीत लवकरच आयटी पार्क उभारले जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले, अमरावतीकरांनी रोड शोला प्रचंड प्रतिसाद दिला, याचा मला आनंद आहे. अमरावती महापालिकेत यापूर्वी भाजपची सत्ता होती आणि आताही भाजपला पूर्ण बहुमत मिळणार आहे. अमरावतीच्या विकासासाठी आमच्या सरकारने अनेक योजना आणल्या. अमृत योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची कामे केली जात आहेत. २१२ कोटी रुपयांचा रस्ते विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीत दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमानोड्डाण प्रशिक्षण संस्था उभारली जात आहे. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, टेक्स्टाईल पार्कमुळे येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. आता पीएम-मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कमुळे लाखो लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. अमरावतीत भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी २५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. २०० कोटी रुपये अंबादेवी प्रकल्पासाठी मिळणार आहेत. छत्री तलाव, वडाळी तलाव सौंदर्यीकरणाची कामे आगामी काळात केली जाणार आहेत.

येथील पंचवटी चौकातून देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला सुरुवात झाली. खुल्या जीपमधून ते विलासनगर, राजकमल चौक, गांधी चौकमार्गे साईनगर येथे पोहोचणार होते. अंबादेवी मंदिरापर्यंत त्यांनी खुल्या जीपमधून प्रवास केला. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. पण, त्यांना अकोला येथे जायचे असल्याने आणि सायंकाळी विमानोड्डाण शक्य नसल्याने त्यांना घाईघाईतच साईनगर येथे पोहोचावे लागले. खुल्या जीपमध्ये त्यांच्यासमवेत माजी खासदार नवनीत राणा, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे आणि इतर नेते होते. साईनगर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी साईमंदिरात दर्शन घेतले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *