टॉप स्टोरी विदेश

ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने फोटो शेअर करत दिला इशारा

वॉशिंग्टन, दि. २० वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरून एक वादातीत फोटो शेअर केला आहे. यामुळे युरोप आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प वारंवार ग्रीनलँडवर अमेरिकेचा दावा करत आहेत. यामुळे जागतिक राजकारणात मोठा वाद सुरू आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ग्रीनलँड अमेरिकेचा भाग असलेल्या संदर्भाचा एक एआय (AI) फोटो शेअर केला आहे. या फोटोत उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि परराष्ट्र संरक्षण सचिव मार्को रुबिओ यांच्यासोबत ट्रम्प अमेरिकेचा झेंडा घेऊन ग्रीनलँडमध्ये उभे आहेत. तर बाजूला एक फलक लावण्यात आला आहे, ज्यावर ‘ग्रीनलँड यूएस टेरिटरी, ऑक्टोबर २०२६’ असे लिहिले आहे. ट्रम्प यांनी हा फोटो शेअर करत ग्रीनलँडला अमेरिकेत सहभागी करून घेण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे युरोपीय देशांमध्ये आणि ग्रीनलँडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, अमेरिकेला ग्रीनलँडची गरज असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी ग्रीनलँडमधील डॅनिश (Danish) लोकांची स्तुती केली. “डॅनिश लोक अद्भुत आहेत आणि त्यांचे नेते महान आहेत,” असे ट्रम्प यांनी म्हटले. पण अमेरिकेला तिथे जाऊन बेटावर नियंत्रण घेणे सोपे नसून आम्ही यावर वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

याच वेळी ट्रम्प यांनी नाटो (NATO) बाबत बोलताना म्हटले की, अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वातच आली नसती. त्यांनी सांगितले की, नाटोमध्ये अमेरिकेने जास्त योगदान दिले आहे. तसेच यामध्ये सर्वात जास्त योगदान ट्रम्प यांच्या काळात देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी जगभर शांतता निश्चित करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

दुसरीकडे ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्कचा विरोध सुरू आहे. अमेरिकेच्या संभाव्य हालचालींच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्क ग्रीनलँडमध्ये सैन्य सराव करत आहे. यामध्ये फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, नेदरलँड्स, फिनलँड या देशांचाही समावेश आहे. पण यामुळे फ्रान्सवर ट्रम्प यांनी १०% टॅरिफ (Tariff) लादले असून हे अधिक वाढवण्याची धमकीही दिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *