बेलापूर पारसिक हिलवर ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ उपक्रमांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी
१५० हून अधिक एनएसएस विद्यार्थ्यांकडून ९०० कि.ग्रॅ.हून अधिक कच-याचे संकलन
नवी मुंबई:स्वच्छ भारत मिशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ अर्थात ‘स्वच्छ आदत से स्वच्छ भारत’ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारसिक हिल बेलापूर येथे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नवी मुंबईतील सहा महाविद्यालयांच्या एनएसएस युनीटमधील उत्साही युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होत हा टेकडी परिसर स्वच्छ केला. १५० हून अधिक एनएसएस विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ९०० कि.ग्रॅ. हून अधिक कचरा संकलित करीत हा परिसर स्वच्छ केला.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी ‘स्वच्छ आदत से स्वच्छ भारत’ या उपक्रमाचे वेगळेपण सांगितले. या उपक्रमाव्दारे प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या दृष्टीने ७ सवयी अंगिकारणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. या सात सवयींमध्ये – रस्त्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला – सुका कचरा वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी म्हणजे घरातूनच करावे, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक वापरण्याचे पूर्णपणे बंद करावे, हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, ‘थ्री आर’ म्हणजे कचरा कमी करणे (Reduce) व कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) आणि कच-यापासून पुनर्निर्मिती करणे (Recycle) ही त्रिसूत्री उपयोगात आणावी, स्वच्छतागृहांचा वापर करावा व ती फ्लश करून स्वच्छ ठेवावीत – अशा सात सवयी अंगिकाराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
कोणतीही सवय लागण्यासाठी सातत्य लागते. एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि शहर स्वच्छतेला बाधा आणण्यासारखी कृती कोणी करताना दिसल्यास त्याला तेथेच चांगल्या शब्दात प्रतिबंध करावा आणि आपल्या शहराच्या स्वच्छता कार्यात योगदान द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबईकर नागरिक स्वच्छता कार्यात नेहमी पुढे असतात, त्यास अनुसरून पारसिक हिलवरील विशेष स्वच्छता मोहीमेत युवकांचा उत्साहाने सहभाग लाभला असल्याचे नमूद करीत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी सहभागी एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, एमजीएम महाविद्यालय कामोठे, स्टर्लिंग कॉलेज ऑफ फार्मसी नेरूळ, दत्ता मेघे इंजिनिअरींग कॉलेज ऐरोली, एफजीनाईक महाविद्यालय कोपरखैरणे व एसकेकॉलेज नेरूळ या ६ महाविद्यालयांच्या एनएसएस युनिटमधील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या समवेत उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक विजय नाईक, संजय पाटील, महेश मोरे यांनी स्वच्छताकर्मींसह महत्वाचे योगदान दिले.




