दीपक मोहिते:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अकाली मृत्यू होणे,ही घटना वसईकरासाठी अत्यंत क्लेशकारक अशीच आहे.वसई विरार उपप्रदेशाच्या विकासासाठी त्यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक होता.
वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे अपक्ष आमदार असूनही त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामाना गेल्या तीन दशकात भरीव आर्थिक निधी दिला.निधी देताना त्यांनी कधीही आमदार कोणत्या पक्षाचा आहे ? असा संकुचित विचार केला नाही.
वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे त्यांच्याकडे हक्काने निधी मागत असत.त्यामुळे वसई,नालासोपारा व बोईसर या तिन्ही मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळू शकली.या उपप्रदेशाची पाणीटंचाई दूर करण्यासंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अजितदादा पवार या दोघानी आर्थिक निधी देताना कधीही हात आखडता घेतला नाही.त्यांच्या अकाली मृत्यूमुळे वसईकर नागरिकांना प्रचंड धक्का बसला असून,राज्याचे फार मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
तसेच पालघर जिह्यातील आदिवासी समाजाच्या योजना तसेच रोजगार हमी योजनेला मुक्त्तहस्ताने ते निधी देत असत. पालघर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या मजुरीची देय रक्कम रखडल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित मजुरीची थकबाकी असलेले १४ कोटी रु. देण्याचे आदेश दिले.विकासासाठी आवश्यक असलेले निर्णय ते बेधडक व धाडसाने घेत असत.
वसई विरारची पाणीटंचाई दूर करण्यासंदर्भातही त्यांचे मोलाचे योगदान होते. सूर्या पाणीपुरवठा योजना निधी अभावी वर्षानुवर्षे रखडली होती. त्यामुळे संपूर्ण वसई तालुका पाणीटंचाईमध्ये होरपळत होता. पहिला टप्पा मार्गी लागला व आता दुसरा टप्पाही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा दरारा व अंगी असलेले धाडस, यामुळे अधिकारीवर्गही धडाडीने काम करत असत.




