गजानन तुपे:राजकारणाच्या रंगमंचावर अनभिषिक्त दादागिरी करणाऱ्या अजित दादांची अकाली एक्झिट झाली. रंगभूमीच्या गत वैभवात जी लोकप्रियता स्व. अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांना मिळाली होती, त्याच्या अनेक पटीने जास्त अजितदादा लोकप्रिय नेते होते. हो आता होतेच म्हणावे लागेल, अजित दादा हे एक अजब रसायन होतं. राजकारणी मंडळींमध्ये आजूबाजूच्यांना आणि कामासाठी येणाऱ्यांना झुलवत ठेवण्याची प्रथा आहे. अजित दादांनी ही प्रथाच मोडीत काढली. कामानिमित्त येणारा कार्यकर्ता असो अथवा कोणी गरीब गरजू असो, काम होणार असेल तर येस म्हणून लगेच त्या कामाला दिशा द्यायची आणि जर ते होण्यासारखे नसेल. तर तिथल्या तिथे नकार द्यायचा, समोरच्याला झटक्यात मोकळं करणारा नेता अशी त्यांची पहिल्यापासूनच ख्याती होती.
दिल्या शब्दाला जागणारा राजकारणी हे बिरूद त्यांना त्यामुळेच सर्वांनी बहाल केले होते. दादांचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणाचा असला तरी बऱ्याच जणांना ते फटकळही वाटत. त्यांच्या फटकळपणाला बोचऱ्या विनोदाची झालरही असायची. असं म्हणतात की नेते आणि अभिनेते यांच्यात फारसा फरक नसतो कारण दोघेही समोरच्या जनसमुदायाला मंत्रमुग्ध करतात. लोकांवर गारुड करतात, त्यांना रडवतात आणि हसवतातही. विनोदी नाटकात काम करणारे बरेचसे विनोदी नट प्रेक्षकांकडून जोरात हशा मिळायला लागला की लेखकाने लिहिलेल्या संहिते बाहेरची म्हणजे स्वतःच्या पदरची वाक्ये (नाटकात त्याला ऍडिशन म्हणतात) पेरून प्रेक्षकांना आणखी हसवून त्यांचे मनोरंजन करतात.
दादांनाही समोरच्या लोकांची नस पकडण्याची कला चांगलीच अवगत होती. एखाद्या कसलेल्या विनोदी अभिनेत्या पेक्षा काकणभर सरस हजरजबाबी पणा आणि वाक्चतुरता दादांकडे होती. मात्र समोरच्या जनसमुदायाला आणखी हसवण्याच्या नादात दादांकडून बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली गेली. त्यामुळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतीस्थळी प्रीतीसंगमावर जाऊन त्यांना अगदी आत्मक्लेषही करावा लागला. बोलून झाल्यावर बरेच राजकारणी सारवासारव तरी करतात किंवा विधानाचा विपर्यास केल्याच्या किंवा झाल्याच्या अगरबत्त्या ओवाळत असतात.
मात्र अजित दादांनी तसे कधीच केले नाही, उलट बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. परंतु ते माझे विधान चुकीचे होते असे म्हणून मनापासून माफी मागण्याचा त्यांचा जसा प्रांजळपणा होता, तसा हल्ली अभावानेच आढळतो. विरोधकांसोबत लढण्याचा दमदारपणा आणि निवडणुका संपल्या की विरोधकांचेही काम मार्गी लावण्याचा दिलदारपणा अजितदादांच्या ठायी होता.
मा. ना. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तालमीत राजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतर त्यांच्यासारखाच लोकसंग्रह करणारे अजितदादा हे एकमेव नेते होते असे म्हणावे लागेल. त्यामुळेच एरवी पहाडासारखे अविचल आणि बेफिकीर वाटणारे त्यांचे विविध जिल्ह्यातील नेते आज आपला कणखरपणा विसरून लहान मुलांसारखे ढसाढसा रडताना दिसत आहेत. त्यांच्या चाहते आणि पक्ष कार्यकर्त्यांसोबतच विरोधकांच्याही डोळ्यात आलेले अश्रू आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले.
सत्तेचा सारीपाट आपल्या चालीनुसार हवा तसा हलवण्याची धमक या नेत्यामध्ये होती. महाविकास आघाडीचे सहकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी झालेला पहाटेचा शपथविधी म्हणजे, अलीकडच्या राजकारणातील एक जबरदस्त रहस्यमय आणि अनाकलनीय घटना होती. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंच्या मंत्रि मंडळातही उपमुख्यमंत्री पदी त्यांना बसवले गेले.
ही गोष्ट त्यांचे राजकीय वजन आणि ताकद काय असेल त्याची साक्ष देते. त्यानंतरच्या काळातील बदलत्या राजकारणातही दादांनी काही वादळी निर्णय घेतले आणि त्या निर्णयाशी ठाम राहून आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोरके होऊ दिले नाही. ही गोष्ट अजितदादा लोकांना किती आपले वाटायचे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. आज-काल राजकारणात स्तुती पाठकांचे चांगले दिवस आहेत मात्र एका शब्दाचीही टीका अथवा विडंबन ऐकण्याची मानसिकता कोणाचीच राहिली नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर
जीवाभावाच्या नात्याची…
कमळाक्का विसरली जाण
हातावर घड्याळ बांधून
धनुष्यातून सुटला बाण,
या आमच्या तत्कालीन राजकीय वात्रटिकेला दुसऱ्या दिवशी मोबाईलवर फोन करून त्यांनी दिलेली दाद “वारे पठ्ठ्या भारीच की” अजूनही स्मरणात आहे. तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ‘देवा मला मुख्यमंत्री करशील का’ हे विडंबन प्रकाशित झाल्यानंतर चार दिवसांनी एका पत्रकार मित्राच्या फोनवर वरून आता गाणीबी लिवाय लागलास का? अशी केलेली विचारणा कधीच विसरण्यासारखी नाही. अजितदादा असेच होते आठ वेळा उपमुख्यमंत्री होऊन ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, ही खंत जेवढी त्यांना होती त्याहून जास्त खंत त्यांच्या चाहत्यांना होती.
शेवटी परमेश्वरी इच्छे पुढे कोणाचेच काही चालत नाही हेच खरे आहे. दादांच्या विमान अपघाताची बातमी कानावर पडली तेव्हा काळ सुद्धा थोडासा थांबल्याचा भास झाला. कारण दादा म्हणजे स्पष्टपणा दिलखुलासपणा आणि दिलदार पणाचे जगावेगळे मिश्रण होते. खरेतर विश्वासच बसत नाही की अजित दादा आपला आता आपल्यात नाहीत. संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाली आहे, राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. एका आगळ्यावेगळ्या स्वभावाच्या, धाडसी आणि मनस्वी नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!





