भाजपचे ९, शिवसेना-मनसे ४, उबाठा २ तर राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीचा १ सदस्य स्थायीवर
सभापतिपदाचे पायसदान कोणाला मिळणार
संख्यबळानुसार भाजपचाच राहणार सभापती
नाशिक । महापालिकेची आर्थिक वाहिनी असलेल्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची त्या त्या पक्षांच्या सभागृहातील सदस्य संख्येनुसार सोमवारी (दि. १६) नियुक्ती करण्यात आली. विशेष महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गटनेत्यांकडून आलेल्या नावांची घोषणा केली.
महापालिकेच्या महापौर-उपमहापौरांच्या निवडीनंतर साऱ्यांच्या नजरा स्थायी समितीवर केंद्रीत झाल्या होत्या. सभागृहातील सदस्य संख्येच्या तौलनिक बळानुसार स्थायी समितीवर भाजपचे ९, शिवसेना-मनसेचे ४, उबाठाचे २ तर राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीचा १ अशा १६ सदस्यांची स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. भाजपचे गटनेते श्याम बडोदे यांनी माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड आणि मच्छिन्द्र सानप यांची नावे महापौरांकडे दिली. शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी मयुरी पवार, किरण गामने-दराडे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे यांची नावे महापौरांना सादर केली. उबाठाचे गटनेते केशव पोरजे यांनी भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची नावे दिली तर राष्ट्रवादीच्या गटनेत्या सीमा ठाकरे यांनी मुकेश शहाणे यांचे नाव महापौरांकडे पाठविले. त्यानुसार महापौरांनी सदस्यांची नावे घोषित केली.
सातव्या पंचवार्षिकच्या पहिल्या वर्षी स्थायी समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मच्छिन्द्र सानप यांच्यासह दीपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर यांची नावे सभापतिपदासाठी चर्चेत असली तरी पहिल्या वर्षी उपमहापौर निवडणुकीत माघार घेतलेल्या मच्छिन्द्र सानप यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने स्थायी समितीच्या सभापतिपद वलयांकित झाले आहे. पहिली दोन वर्षे महत्वाची असल्याने अनेकांनी यासाठी फिल्डिंग लावलेली होती; परंतु भाजपने मनाशी जरा वेगळे गणित मांडत सदस्यांच्या नियुक्त्या केल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला.




