टॉप स्टोरी देश महाराष्ट्र

अजित पवार यांच्या दुःखद निधनावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे योगदान उल्लेखनीय, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु
“महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.”अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल नेहमीच लक्षात राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. या अपघातात जीव गमावलेल्या इतर सर्वांच्या कुटुंबियांना हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो,” असे त्या म्हणाल्या.
……

अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
………….
कुशल प्रशासक हरविला,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्ष राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो, असे गडकरी म्हणाले.
………
महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारा नेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील लोकनेते, जनसामान्यांत प्रचंड आस्था असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याची माहिती होती. शिवाय महाराष्ट्रातील प्रश्नांची त्यांना जाण होती. न डगमगता सदैव पुढे जाणारे व्यक्तिमत्व असणारे अजित पवार संघर्षाच्या काळातही माझ्यासोबत होते. अशा या कठीण काळात महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची गरज होती. असा दमदार आणि दिलदार माणूस आपल्या मधून निघून गेला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या परिवाराशी चर्चा करून पुढील गोष्टींचे निर्णय घेतल्या जातील. त्यांच्या निधनाप्रसंगी एक दिवसाची शासकीय सुट्टी व तीन दिवसांचा दुःखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
………..
महाराष्ट्रातील मोठा नेता पडद्याआड, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
गेली 25 वर्ष सातत्याने अजित पवार यांच्यासोबत कधी सत्ताधारी बाकावर तर कधी विरोधी बाकावर बसून काम करण्याची संधी मिळाली. आणि आज महाराष्ट्रातील एक मोठा नेता पडद्याआड गेला आहे यावर विश्वास ठेवणे ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. जनतेच्या सदैव संपर्कात असलेला नेता आज आपल्यात नाही ही दुःखद गोष्ट आहे.
……..

दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका, अमित देशमुख
अजित पवार यांचे अकाली जाणे मनाला चटका लावणारी घटना आहे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. अजित पवारांचे योगदान कायम लक्षात राहण्यासारखे असून राजकारणात कायम धबधबा धरून ठेवणारा नेता हरवला आहे.
……….
बाहेरून कठोर पण संवेदनशील मनाचे नेते, भाजप खासदार उज्वल निकम
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर भाजप खासदार उज्वल निकम यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अजितदादा महाराष्ट्राचे लाडके होते आणि आपला शब्द पाळणाऱ्यांपैकी ते होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणतात की एकदा माझ्या कारचा अपघात झाला असताना त्यांनी फोन करून काळजी व्यक्त केली. बाहेरून जरी ते कठोर दिसत असले तरी तेवढेच संवेदनशील होते.
……….
अजित पवारांसोबत महाराष्ट्राचं राजकारण बेचव होईल, खासदार संजय राऊत

“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतोय. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील”, असं संजय राऊत म्हणाले.
………….
देशाने एक दूरदृष्टी असलेल्या नेता गमावला, चंद्रशेखर बावनकुळे
प्रशासनावरची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोक कल्याणचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे अजितदादा यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. अजितदादा यांचा प्रशासनाचा अनुभव अतिशय समृद्ध होता. त्यांच्याकडून सल्ला घेत विविध विषयांवर मी चर्चा करीत असे. अनेक प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याची शैली मला नेहमी प्रेरणा देणारी वाटली. अजित दादांचे जाणे हे महाराष्ट्रावर कोसळलेले संकट आहे. देशाने एक दूरदृष्टी संपन्न नेता गमावला आहे. असा शोक संवेदना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.
….,..
पवार कुटुंबीयांप्रति संवेदना, राहुल गांधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी खूप वेदनादायी आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनाने प्रति संवेदना व्यक्त करतो. अशा भावना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या.
………
एक मोठा भाऊ गमावल्याचे दुःख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. “आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे. एक दिलखुलास मनमिळावू, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि रोखठोक नेता आपण आज गमावला. अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि राजकारणातील अनुभवानेही. एक उमदा सहकारी आणि त्यापलीकडे एक मोठा भाऊ गमावल्याचं मला दुःख आहे.
…………..
“हे खूप चुकीचे घडले”, अंजली दमानिया

अंजली दमानिया म्हणाल्या की, “डोकं खूप खूप सुन्न झालं ऐकून! विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे”, अशा शब्दात दमानियांनी दुःख व्यक्त केले आहे.
………
दुर्घटनेच्या चौकशीची मागणी, महाराष्ट्र काँग्रेस नेते नितीन राऊत

महाराष्ट्र काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि दुर्घटना बद्दल चिंता व्यक्त केली.
त्यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आणि राजकीय नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि लहान विमानांचा वापर करू नये असा इशारा दिला.
………..
अजित पवार स्पष्टवक्ता नेते, भाजपा नेते नितीन भुतडा
अजित पवार हे आपले शब्द पाळणारे स्पष्टवक्ता नेते होते.
दादा त्यांच्या अंतर्ज्ञानी आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादांसाठी ओळखले जात होते. प्रशासनावर मजबूत पकड असलेले, सहा दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले, सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले आणि नेहमीच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे दादा आपण गमावलेले आहे. अजित दादा यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
…………

विरोधी म्हणून भेदभावाची वागणूक मिळाली नाही, मदन येरावार माजी आमदार
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला. आमदार आणि मंत्री असताना माझा दादांशी नियमित संवाद होत असे. पण केवळ विरोधी पक्षात असल्याने मला त्यांच्याकडून कधीही भेदभावाची वागणूक मिळाली नाही.जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासमोर विकासाशी संबंधित कोणताही मुद्दा मांडत असे, तेव्हा ते लगेच समजून घेत असत आणि जागेवरच सकारात्मक निर्णय घेत असत. अजित पवार हे एक अतिशय सरळ, शिस्तप्रिय, दूरदर्शी आणि यशस्वी अर्थमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नेहमीच लक्षात ठेवेल.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *