टॉप स्टोरी राजकारण

ग्रामीण महाराष्ट्रात ‘कमळ’ जोरात, मविआचा सुपडा साफ !

विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना ‘आरसा’, काय म्हणाले नेत्यांबद्दल?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:”राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निकालांनी महायुतीच्या बाजूने दिलेला कौल म्हणजे विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. भाजपने स्वतःचा २०१७ चा रेकॉर्ड मोडीत काढला असून ग्रामीण जनतेने विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला मतपेटीतून चोख उत्तर दिले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विजयाची आकडेवारी मांडताना सांगितले की, भाजपने जिल्हा परिषदेत २३६ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पंचायत समित्यांचा विचार करता २०१७ च्या २८४ जागांच्या तुलनेत यंदा ४१० जागा जिंकून पक्षाने मोठी झेप घेतली आहे. “आज ५० हून अधिक पंचायत समित्यांवर एकट्या भाजपचा झेंडा आहे, तर महायुतीने १०० चा आकडा पार केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी तर कोल्हापूर-लातूरमध्ये महायुती प्रथम क्रमांकावर आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, “विरोधक केवळ सकाळी ९ वाजता टीव्हीवर दिसतात, ते जनतेत जात नाहीत म्हणूनच त्यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे अस्तित्व आता संपुष्टात आले असून काँग्रेसला आता उशिरा जाग आली आहे. विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण त्यांचे खोटे नॅरेटिव्ह आता चालणार नाहीत.”

इतर महत्त्वाचे मुद्दे:

शरद पवारांसाठी प्रार्थना: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अलिकडच्या तणावपूर्ण घटनांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असावा, असे सांगत त्यांनी पवारांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषेचा सन्मान: मराठी भाषे संदर्भातील समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून, तो लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुतळा विटंबनेचा निषेध: तेलंगणात महापुरुषांच्या पुतळ्याची झालेली विटंबना दुर्दैवी असून, ही कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *