महाराष्ट्राच्या पर्यटनाचा सुवर्ण महोत्सव; ५० वर्षांच्या प्रवासाचा खास ‘लोगो’ लाँच, मंत्र्यांनी काय केला नवा संकल्प?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित एका विशेष सोहळ्यात महामंडळाच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या विशेष ‘लोगो’चे अनावरण करण्यात आले. यासोबतच महाराष्ट्राच्या सौंदर्याची झलक दाखवणारी सुवर्णमहोत्सवी दिनदर्शिका (कॅलेंडर) आणि दैनंदिनीचे (डायरी) प्रकाशनही मोठ्या दिमाखात पार पडले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेला नवीन ‘लोगो’ हा महाराष्ट्राच्या विविधतेचे प्रतीक मानला जात आहे. या लोगोमध्ये राज्याचे ऐतिहासिक किल्ले, ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि वन्यजीव अशा सर्व वैशिष्ट्यांचा मेळ घालण्यात आला आहे. लोगोच्या शिरोभागी असलेले ‘त्रिमूर्ती’ हे महामंडळाचे अधिकृत चिन्ह १९७५ पासूनच्या समृद्ध परंपरेची आठवण करून देते. मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी नमूद केले की, गेल्या पाच दशकांत ‘एमटीडीसी’ने पर्यटकांना उत्तम सेवा देत राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घातली आहे.
पर्यटकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांची आणि एमटीडीसीच्या निसर्गरम्य निवासांची आकर्षक छायाचित्रे देण्यात आली आहेत. डायरीमध्ये महामंडळाच्या विविध उपक्रमांची, उपहारगृहांची आणि ‘आई’ सारख्या महिला सक्षमीकरण उपक्रमांची रंजक माहिती समाविष्ट आहे. या कार्यक्रमाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्णमहोत्सवी वर्षामुळे आगामी काळात राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी गती मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
—
Deepak Kaitke




