बुलढाणा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी भव्य पदयात्रा

बुलढाणा, दि. 17 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, क्रीडाप्रेमी, विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुंभरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पदयात्रेचे नियोजन, मार्गक्रमण, सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तबद्ध आयोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ही पदयात्रा जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नगरपरिषद, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

पदयात्रेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणे, युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे आणि सामाजिक ऐक्य बळकट करणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *