नवी मुंबई:अनुज्ञाप्ती व बाजार शुल्क न भरता शेतमालाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षता पथकातर्फे धडक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान १७ कोटी ५१ लाख ३० सहस्र रुपयांचा शेतमाल जप्त करण्यात आला आला आहे. तसेच संबंधितांवर तीनपट दंड आकारत ५९ लाख ९० सहस्र रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ही कारवाई जे.एन.पी.टी., तुर्भे, नेरुळ, ठाणे-बेलापूर परिसरात करण्यात आली. बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
दक्षता पथकाच्या तपासात अनेक व्यापाऱ्यांनी बाजार समितीची अनुज्ञाप्ती न घेता तसेच सेस आणि देखरेख शुल्क न भरता थेट व्यवहार केल्याचे उघड झाले. काही आयातदारांनी आयात केलेला शेतमाल बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आणताना पूर्वसूचना दिली नव्हती तर, काही प्रकरणांत आयातदार अनुज्ञाप्ती नसतानाही व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.




