नवी मुंबई:महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पण भावनेने केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा असून आज सेवानिवृत्तीचा हा निरोप समारंभ नसून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव समारंभ आहे अशा शब्दात नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या दिलखुलास मनोगतातून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून माहे डिसेंबर 2025, जानेवारी व फेब्रुवारी 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या 28 अधिकारी, कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सन्मान समारंभ महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ कैलास गायकवाड, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ रत्नप्रभा चव्हाण, माजी उपायुक्त डाॅ.अमरीश पटनिगिरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या सेवानिवृत्ती सन्मान समारंभामध्ये डिसेंबर 2025 महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या महापालिका सचिव
चित्रा बाविस्कर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी विजय पडघन, सहाय्यक लेखा अधिकारी वसंत म्हात्रे, मुख्याध्यापिका नलिनी चौधरी, शिक्षिका मीनाक्षी हिंगे,इंदिरा पाटील, वंदना राऊत, प्राथमिक शिक्षक चंदू भदाणे, नेहा पालव, पद्मिनी तांबे, महेश पाटीलअधिक्षक प्रकाश वाकचौरे, श्वेता लोखंडे, सहाय्यक अभियंता विकास वखारे, आरोग्य सहाय्यक बाळकृष्ण वर्ये, समुदाय समन्वयक मोहन गायकवाड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता चौधरी, सिस्टर इन्चार्ज पुष्पा गुप्ता, मेट्रन रेचल पटनीगिरे,स्टाफ नर्स मिथिला शिंदे, सहाय्यक अधिसेविका कल्पना कोळेकर, ऑक्झलरी नर्स मिडवाईफ जयंती पुजारी, वाहनचालक भागवत कोरडे, दत्तात्रय पाटील, सफाई कामगार शकुंतला म्हस्के, सफाई कामगार भानुदास रसनभैरे यांचाही शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्यासमवेत महापालिका सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेणारे उपमुख्य लेखा वित्त अधिकारी तथा उपमुख्य लेखा परीक्षक श्याम पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.
महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणजे बौद्धिक व अनुभवसंपन्न मालमत्ता असून असे अनुभवी कर्मचारी घडण्यासाठी पंधरा-वीस वर्षे जातात. त्यामुळे अशा अनुभवी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही एक प्रकारे संस्थेचे हानी असल्याचे मत उपमहापौरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सेवानिवृत्ती हा शेवट नाही तर एक नवी सुरुवात आहे हे समजून यापुढील काळ कुटुंबीयांसमवेत आनंदाने जगा व आरोग्याकडे लक्ष द्या असे सांगितले. यापुढे महानगरपालिका सेवेत नसलात तरी या शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या महानगरपालिकेशी संपर्कात रहा व महानगरपालिका आणि नागरिक यामधील दुवा बना असे आवाहन त्यांनी केले.
उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या जडणघडणीत अगदी सुरुवातीपासूनचे सहकारी असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची सेवानिवृत्ती त्यांचे रोजचे भेटणे दुरावणार म्हणून मनाला आवडणारी नसली तरी या पुढील काळात त्यांना त्यांच्या आवडीच्या राहून गेलेल्या गोष्टी करता येतील याचा आनंदही देणारी आहे असे मत व्यक्त केले.
मुख्य विधी अधिकारी अभय जाधव यांनी सर्वांना शुभेच्छा देत स्वच्छतेची कविता सादर केली. अनेक अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्तांचे कुटुंबीय यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.
सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करतांना महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना मिळालेली ओळख ही महानगरपालिकेची देणगी असल्याचे सांगत महानगरपालिकेच्या नावलौकिकात खारीचा वाटा उचलता आला हे आपले सर्वांचे भाग्य असल्याचे सांगितले. महापालिका सचिव पदाचा कार्यप्रवास कथन करताना वेगवेगळे अनुभव सांगत त्यांनी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचारी यांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नामांकित कवयित्री असलेल्या चित्रा बाविस्कर यांनी स्वलिखित उत्तम कविता सादर केली.
याप्रसंगी आपल्या सहकाऱ्यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देताना महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.



