उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये स्मार्ट मीटरचा गोंधळ; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडीत , महावितरण कार्यालयात संतप्त नागरिकांचा हंगामा

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : स्मार्ट मीटर प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शनिवारी सकाळी उल्हासनगरमध्ये हजारो ग्राहक संतप्त झाले. मीटरमध्ये वीज उपलब्ध दाखवत असतानाही घरातील वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्याने सुमारे १००० ते १५०० घरांमध्ये अंधार पसरला. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी साईबाबा मंदिराजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कार्यालयात समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली धडक देत अधिकाऱ्यांविरोधात तीव्र निषेध नोंदविला आहे .

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, जुन्या मीटर पद्धतीत वीज खंडीत करण्यापूर्वी मोबाईलवर पूर्वसूचना दिली जात होती. त्यामुळे बिल भरण्यासाठी वेळ मिळत होता. आता मात्र स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वीजपुरवठा बंद केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. काहींनी तर बिल भरल्यानंतरही अनेक तास वीज सुरू न झाल्याचा आरोप केला आहे .
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक कुटुंबांची गैरसोय झाली. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. तसेच काही घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण असल्याने त्यांच्या आरोग्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली.
नागरिकांनी स्मार्ट मीटरमधील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, वीज खंडीत करण्यापूर्वी अनिवार्य पूर्वसूचना द्यावी आणि बिल भरल्यानंतर त्वरित वीजपुरवठा सुरू करण्याची पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणी रगडे यांनी केली आहे. हजारो रुपये भरूनही वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याने स्मार्ट मीटर प्रणालीबाबत उल्हासनगरमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अतिरिक्त अभियंता भास्कर कोळे यांनी सांगितले की, नवीन स्मार्ट मीटर मोबाईल प्रीपेड प्रणालीप्रमाणे कार्य करते. वेळेत बिल न भरल्यास वीज आपोआप बंद होते आणि बिल भरल्यानंतर ती आपोआप सुरू होणे अपेक्षित असते. मात्र शनिवारी प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्घभवली . सायंकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता असून सर्व नियंत्रण बांद्रा येथील मुख्यालयातून केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *