मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
इराण-इस्रायल संघर्षानंतर काही देशांनी आपली हवाई हद्द (एअर स्पेस) बंद केली. त्यानंतर पर्यटन अथवा व्यावसायिक कारणांनी त्या भागात गेलेल्या भारतीयांकडून मदतीचे संदेश येऊ लागले.
राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांशी समन्वय साधण्यात आला. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली असून, नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांना सुरक्षितरित्या परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एअर इंडियाची विमाने टप्प्याटप्प्याने संबंधित देशांकडे रवाना होत असून नागरिकांना परत आणण्याचे कार्य सुरू आहे. काही देशांची हवाई हद्द अद्याप बंद असली तरी ज्या मार्गानी प्रवास शक्य आहे, त्या मार्गाचा उपयोग करून नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. कुवेत येथे ट्रान्झिटमध्ये असलेल्या काही नागरिकांकडे स्थानिक व्हिसा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र त्यांना सुरक्षित स्थळी थांबविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक मराठी मंडळे तसेच अन्य संघटनांना सक्रिय करून मदतकार्य वेगाने राबविले जात आहे. गिरीश महाजन यांनी संबंधितांशी दूरध्वनी व व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. राज्याच्या प्रोटोकॉल विभागालाही जबाबदारी देण्यात आली असून, दूतावासांच्या बैठका घेऊन नागरिकांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि काय टाळावे, याबाबत दोनदा सूचना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी त्यांच्या पक्षामार्फत काही नागरिकांच्या परतीची स्वतंत्र व्यवस्था केली असून, तो उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. सध्या काही हवाई मार्ग असुरक्षित असल्याने सर्वतोपरी दक्षता घेऊनच विमानांची ये-जा सुरू आहे. उपलब्धतेनुसार एअर इंडियासह इतर विमानसेवा वापरून नागरिकांना सुरक्षितरित्या परत आणले जात आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारेल आणि अडकलेले नागरिक महाराष्ट्रात परततील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दुबई येथे आमदार मिहिर कोटेचा यांनी काही ठिकाणी भोजनव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. विविध स्तरांवरून मदतकार्य सुरू आहे. परदेशातील भारतीय, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रातील मोदी सरकार अत्यंत संवेदनशील असून, गेल्या काही वर्षांतही अशा परिस्थितीत भारतीयांना सुरक्षित परत आणण्याची कामगिरी करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीतही ना सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या परत आणण्याचे कार्य केंद्र सरकारकडून केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भारताकडे सुमारे दोन महिन्यांसाठी पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याने तात्काळ इंधन दरवाढ होण्याची शक्यता नाही. इंधनदर वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
gajanantupe2@gmail.com




