टॉप स्टोरी महाराष्ट्र

जे.जे. रुग्णालयातील ‘असंवेदनशील’ कारभारावर चाबूक; दोषी कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती तैनात

विशेष प्रतिनिधी:राज्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे.जे. रुग्णालयातील (ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) समाजसेवा विभागाचा ‘असंवेदनशील’ कारभार अखेर चव्हाट्यावर आला आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या हीन वागणुकीबाबत प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या कारवाईमुळे रुग्णालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आमदारांच्या पत्राने उडाली खळबळ
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी या प्रकरणी थेट अधिष्ठात्यांकडे धाव घेतली होती. रुग्णालयातील, विशेषतः समाजसेवा विभागातील (Social Service Department) काही कर्मचारी अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून, ते रुग्णांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी त्यांना मनस्ताप देत असल्याचा आरोप आमदार निकम यांनी पत्राद्वारे केला होता. या पत्राची दखल घेत प्रशासनाने ही तातडीची कारवाई केली आहे.

बायोमेट्रिक अहवालही तपासणार
केवळ गैरवर्तनाची चौकशीच नाही, तर समाजसेवा विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांचा मागील एका वर्षाचा बायोमेट्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिले आहेत. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध यापूर्वी शिस्तभंगाची कारवाई झाली आहे, त्यांचाही सविस्तर इतिहास ही समिती तपासणार आहे.

चौकशी समितीचे स्वरूप:
मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन नागोराव अन्नपुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, त्यात सदस्य सचिव म्हणून डॉ. अश्विनी जाधव (प्राध्यापक) आणि सदस्य म्हणून संतोष महादेव गोसावी (प्रशासकीय अधिकारी) यांचा समावेश आहे. समितीला या प्रकरणाचा सखोल तपास करून तातडीने अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

“रुग्णांची सेवा हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. यात कुचराई करणाऱ्या किंवा नातेवाईकांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. चौकशी अहवालानुसार दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”

— प्रशासन, जे.जे. रुग्णालय

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *