प्रस्थापितांच्या लाटेत वंचितची ‘एक्झिट’ की एमआयएमचा ‘गेम ओव्हर’? मिनी मंत्रालयाच्या निकालात छोटे पक्ष का ठरले भुईसपाट?
विशेष प्रतिनिधी:राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी प्रस्थापित राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब केले असून, ‘किंगमेकर’ ठरू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांना मतदारांनी जोरदार झटका दिला आहे. महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या या पक्षांचा ग्रामीण भागात मात्र पूर्णपणे सुपडा साफ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि लातूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये या दोन्ही पक्षांना खाते उघडण्यातही अपयश आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची पीछेहाट सर्वांत धक्कादायक ठरली आहे. महापालिकेत ३३ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही. हीच स्थिती प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची असून, लातूर आणि संभाजीनगरमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही. लातूरमध्ये काँग्रेसने २२ जागांसह आपले वर्चस्व राखले, तर भाजपने १८ जागा जिंकून कडवे आव्हान दिले. विशेष म्हणजे, या दोन्ही जिल्ह्यात वंचित आणि एमआयएमपेक्षा मनसेने सरशी घेत लातूरमध्ये एक जागा खिशात घातली आहे.
धाराशिव जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीसाठी केवळ एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ईट सर्कल पखरुड पंचायत समिती गणातून प्रियंका प्रवीण रणबागुल यांनी १,१३३ मतांनी विजय मिळवत पक्षाची अब्रू राखली आहे. मात्र, जिल्हा परिषद स्तरावर वंचितची पाटी कोरीच राहिली आहे. प्रस्थापितांच्या संघर्षात मतदारांनी छोट्या पक्षांना नाकारून महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनाच झुकते माप दिल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.
—
Deepak Kaitke




