टॉप स्टोरी महाराष्ट्र

‘आज लग्न आणि अपत्य २०४७ मध्ये?’; विधानसभेत कडाडल्या तोफा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प की कंत्राटदारांची दिवाळी?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:”हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की केवळ मुंबई-एमएमआरडीएचा विकास आराखडा?” असा बोचरा सवाल करत विरोधी पक्षाने सरकारच्या ७.६९ लाख कोटींच्या ‘महा-बजेट’वर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याच्या विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या उपरोधिक शैलीत सरकारचा समाचार घेतला. “आज लग्न लावून अपत्य २०४७ मध्ये होईल, अशी ही स्वप्नवत आणि फसवी आश्वासने आहेत,” अशा शब्दांत त्यांनी या बजेटची लक्तरे वेशीवर टांगली.

उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर, केवळ ठराविक शहरांचाच विचार?

वडेट्टीवार यांनी या अर्थसंकल्पातील प्रादेशिक असंतुलनावर बोट ठेवले आहे. त्यांच्या मते, हे बजेट संपूर्ण महाराष्ट्रासाठी नसून केवळ मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरी भागापुरते मर्यादित आहे. “नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांचे काय? सिंचन, शिक्षण आणि आरोग्यासाठी ठोस तरतूद कुठे आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील जनतेला या चकाकत्या आकड्यांच्या खेळात पूर्णपणे विसरले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कर्जाचा डोंगर आणि कंत्राटदारांचे भले!

राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी आकडेवारीचा पाढाच वाचला. २०१४ मध्ये राज्यावर २.९० लाख कोटींचे कर्ज होते, ते आता कैक पटीने वाढले असून महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा दावा त्यांनी केला. “हा अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी नसून केवळ कंत्राटदार आणि बड्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे. प्रचंड कमिशनखोरीतून सरकार स्वतःला मजबूत करत आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच?

शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असताना, सरकारने पुन्हा एकदा केवळ शब्दांचा बुडबुडा तयार केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. मागील वर्षीच्या घोषणा अद्याप कागदावरच असून नवीन घोषणांची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल त्यांनी विचारला.

सरकारच्या या धोरणावर अत्यंत मार्मिक टिप्पणी करताना वडेट्टीवार यांनी एका शेराचा आधार घेतला:”तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!”

एकूणच, सत्ताधारी पक्षाने याला ‘ऐतिहासिक’ म्हटले असले, तरी विरोधकांनी मात्र याला ‘आकड्यांची धूळफेक’ ठरवून आगामी काळात आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *