नवी मुंबई :श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ वितरण सोहळ्यात सिवुड्स नवी मुंबई येथील मिता संजय गंगावणे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.
.या सोहळ्यात स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात उल्लेखनीय व निरलस कार्य करणाऱ्या डॉ. मिता संजय गंगावणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सिवुड्स, नवी मुंबई येथील रहिवासी असलेल्या डॉ. गंगावणे या मूळ सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे नवी मुंबईसह संपूर्ण पाचगणीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत (दादा) पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. छगन भुजबळ उपस्थित होते. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रातील सहा महसुली विभागांमधून निवड करण्यात आलेल्या एकूण ११ महिलांना सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या भव्य सोहळ्यास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उच्च शिक्षण संस्थांचे संचालक, अध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सहसंचालक डॉ. अर्चना बो-हाडे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सहकार्याने व डॉ. देवळानकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडले.
हा सोहळा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणारा ठरला.




