काबूल, दि. ४ वृत्तसंस्था हंगामातील पहिल्या मुसळधार पाऊस अन हिमवृष्टीने अफगाणिस्तानातील दीर्घकाळापासून सुरू असलेला दुष्काळ मोडीत काढलाय, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झालेत. मुसळधार पावसामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झालंय, असंही अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहंमद युसूफ हबीब यांनी सांगितले.
हबीब यांच्या मते, पुरामुळे रस्ते, घरे आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालंय. या आपत्तीमुळे सुमारे १८०० कुटुंबे प्रभावित झालीत, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कठीण परिस्थिती आणखी बिकट झालीय. हेरात प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते मोहंमद युसूफ सईदी यांच्या मते, हेरात प्रांतातील काबाकान जिल्ह्यात घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे.
हबीब म्हणाले की, एजन्सीने सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात मूल्यांकन पथके पाठवली आहेत आणि पुढील गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. शेजारील पाकिस्तान आणि भारताप्रमाणे अफगाणिस्तानदेखील अत्यंत हवामानविषयक घटनांना, विशेषतः हंगामी पावसानंतर येणाऱ्या अचानक आलेल्या पुरांना बळी पडण्यास अत्यंत असुरक्षित आहे. दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, खराब पायाभूत सुविधा, जंगलतोड आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम यामुळे अशा आपत्तींचा परिणाम वाढलाय.




