गोरेवाडा येथे पैसे वाटप होत असल्याची माहिती समजताच प्रभाग क्रमांक 11 चे भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
पैशाचे आमिष दाखवून मतदान आपल्या बाजूने करण्याच्या आणि त्यातून हाणामारी झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. अशातच नागपूर येथे गोरेवाडा येथे पैशाचे वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर , प्रभाग क्रमांक 11 चे भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे दोन कार्यकर्त्यांसह त्या भागात गेले होते. शिंगणे यांना बघतच तिथे असलेल्या 40-50 नागरिकांनी त्यांच्यावर तसेच सोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला.
यात एक सहकारी खाली पडल्यानंतर शिंगणे त्यांना उचलण्यासाठी खाली वाकले असता भूषण शिंगणे यांना खाली पडण्यात आले. चेहऱ्याचा बचाव करताना हात समोर केला असता, हातावर दगडाने मारण्यात आले. रक्ताची धार वाहू लागली. पायावरही मारण्यात आले. ते तिथून जिवंत जाऊ नये अशीच मारहाण करण्यात आली. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रखर टीका केली आहे. भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ पोलिस कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.




