खोदकामातील मातीची परस्पर विक्री;निकृष्ट साहित्य वापराचा आरोप
मौदा:-धानला–कोदामेंढी रस्ता कामातील मातीची प्रति ट्रक १ हजारांनी विक्री
खोदकामातील मातीची परस्पर विक्री; निकृष्ट साहित्य वापराचा आरोप
मौदा प्रतिनिधी :धानला–कोदामेंढी सिमेंटीकरण रस्त्याचे कोट्यवधी रुपयांचे काम अभी इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले आहे. चारभा परिसरात काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. मात्र, रस्त्यालगत व नाली खोदकामातून निघालेल्या मातीची परस्पर प्रति ट्रक १ हजार रुपये दराने विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर मातीची विक्री करणाऱ्या सुपरवायझरसह यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासनाने रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असताना, प्रत्यक्ष कामात मात्र निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. मुरुमाऐवजी मातीचा भरणा, तर काही ठिकाणी मातीमिश्रित मुरुमाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
रस्ता खोदकामातून निघणारी माती ही परिसरातील गरजू नागरिक व शेतकऱ्यांना मोफत देणे अपेक्षित असते. मात्र, रस्त्याची देखरेख करणाऱ्या सुपरवायझरने काही स्थानिक राजकीय व्यक्तींना सोबत घेऊन गरिबांकडून प्रति ट्रक १ हजार रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे २०० पेक्षा अधिक ट्रक मातीची विक्री झाल्याचेही बोलले जात असून, जमा झालेला पैसा कुठे गेला, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या कामात खोदकाम केल्यानंतर त्यामध्ये मुरुमाचा भरणा करणे बंधनकारक असताना, अभी इंजिनिअरिंगकडून मातीचा भरणा सुरू असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.
कंपनीची भूमिका
“आम्ही कोणत्याही लाभार्थ्याकडून किंवा गावातील नागरिकांकडून पैसे घेत नाही. सरपंच व उपसरपंच यांच्या माध्यमातूनच भरलेले ट्रक पाठवले जातात. जुना मलमा काढताना तो गावातील नागरिक व शेतकऱ्यांना विनामूल्य दिला जातो. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने पैसे घेतले असल्यास आमच्याकडे तक्रार द्यावी; दोषींवर कारवाई केली जाईल.”
– आशिष काहाते, प्रोजेक्ट मॅनेजर, अभी इंजिनिअरिंग
नागरिकांचा आरोप
“पिपरी व चारभा गावात निघालेला लाखो रुपयांचा भरणा काही लोकप्रतिनिधींनी विकून गोरगरिबांची लूट केली आहे. कंपनीने चौकशी करून दोषींंकडून वसुली करून ती रक्कम लाभार्थ्यांना परत द्यावी.”
– असुराज किरपान, पिपरी
सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
“धानला–रेवराल मुख्य रस्त्यावरील खोदकामातील माती परिसरातील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांवर मोफत टाकणे गरजेचे होते. मात्र, काही शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यात आले. वरिष्ठांनी याची चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी.”
– खुशाल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते, पिंपरी




