लापका रोडवर ट्रक जप्त; महसूल अधिकाऱ्यांची सतर्कता कौतुकास्पद
मौदा :- मौदा तहसीलदार यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेत प्रभावी कारवाई केली आहे. (दि. 20 )जानेवारी रात्री सुमारे 11.49 वा. दरम्यान मौदा–लापका मार्गावर करण्यात आलेल्या तपासणीत MH 40 CM 4032 क्रमांकाच्या ट्रकमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.प्राप्त माहितीनुसार, संबंधित ट्रकची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही वैध परवानगी अथवा अधिकृत कागदपत्रे नसताना रेती वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तात्काळ कारवाई करत सदर ट्रक पोलीस स्टेशन मौदा येथे अटकाव करण्यात आला.
सदर कार्यवाही तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी नुपराज पर्वते, ग्राम महसूल अधिकारी विजय कामठीकर, महसूल सेवक विपूल मानकर, राजू लिंगाइत वाहन चालक दिलीप राठोड यांनी केले.
अवैध रेती उत्खनन व वाहतूक ही शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम करणारी असून पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत महसूल विभागाने दाखवलेली सतर्कता व तत्परता ही निश्चितच कौतुकास्पद आहे. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे प्रशासनाची शिस्त, कर्तव्यदक्षता व जनहिताची जाणीव दर्शवते.
स्थानिक नागरिकांमधूनही महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यात अशाच कठोर कारवायांमुळे अवैध व्यवसायांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग अवैध रेती वाहतुकीविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.




