बदलापूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृह अभावी प्रवाशांचे हाल;ई-टॉयलेट उभारण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
बदलापूर, दि.२१,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बदलापूर बस स्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो एसटी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेअभावी विशेषतः महिला, विद्यार्थी प्रवासी यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात आधुनिक ई-टॉयलेट उभारण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासन ई-टॉयलेट उभारण्यासाठी तयार असले तरी, एसटी महामंडळाकडून आवश्यक ना हरकत दाखला न मिळाल्याने हे काम रखडले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान,प्रसाधनगृहांसह पिण्याचे पाणी, बसण्याची आसन व्यवस्था ठिकाणी स्वच्छता, परिसरातील स्वच्छता व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.




