नवी दिल्ली, दि.२३। प्रतिनिधी रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला जात असताना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना पोलिसांनी अटक केली. एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी जातीय तेढ आणि राष्ट्रीय सुरक्षेवरून त्यांच्यावर दिमापूरमध्ये गुन्हा दाखल केला होता. अटकेबाबत वकील अभिषेक मनु सिंघवी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने दुपारी ३ वाजता सुनावणी सुरू केली आणि सुमारे ३५ मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटिसाही बजावल्या आणि तीन ठिकाणी नोंदवलेले खटले एकाच अधिकारक्षेत्रात आणण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. आसामआसाम सरकारच्या वतीने एएसजी ऐेशर्या भाटी यांनी युक्तिवाद केला. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी खेरा यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवले. रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात खेरा सहभागी होणार होते. या कारवाईच्या निषेधार्थ विमानात उपस्थित असलेले इतर काँग्रेस नेते भाजपविरोधात घोषणाबाजी करत विमानातून खाली उतरले.