ठाणे , दि.२३। प्रतिनिधी ठाण्यातील नौपाडा परिसरातील बी केबिन येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना ढिगारा कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. नौपाडा पोलीस देखील घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरु आहे. हबीब आणि रणजित अशी मृत कामागारांची नावे असून निर्मल कुमार गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे.जेसीबीने खालची माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्याखाली ३ कामगार अडकले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही वेळातच ढिगारा बाजूला केल्यावर त्याखाली अडकलेल्या २ जणांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर एक कामगार गंभीर जखमी आढळला, त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.