बदलापूर

कुळगाव–बदलापूर नगरपरिषद उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजपचा व्हीप जारी, नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

बदलापूर, दि.८,प्रतिनिधी:कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने उपनगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवार प्रियांका दामले यांना मतदान करण्याचे आदेश देत अधिकृत व्हीप जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे गटनेते शरद तेली यांनी व्हीप जारी करत सर्व नगरसेवकांना प्रियांका दामले यांनाच मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कडक कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

निवडणुकीत कोणताही दगा-फटका होऊ नये तसेच मतफुटी टाळण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले असल्याचे समजले. भविष्यातील बदलापूरच्या विकास प्रकल्पांवर परिणाम होऊ नये आणि नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडेच राहावीत, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.सध्या नगरपरिषदेत एकूण ४९ नगरसेवक असून बहुमतासाठी २५ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपचे २२ तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक मिळून युतीकडे २५ नगरसेवक आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे स्वबळावर २४ नगरसेवक आहेत.

दरम्यान, उपनागराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.निवडणुकीकडे संपूर्ण बदलापूर शहराचे लक्ष लागले असून, अंतिम निकाल काय लागतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *