वर्धा

वडनेरच्या बस स्थानकावर सावित्रीच्या लेकी ताटकळत

 राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानकाचा उपयोग विद्यार्थी व प्रवाशांना नाही
 पाणी, शौचालय नसल्यामुळे हेच काय अच्छे दिन म्हणण्याची वेळ सावित्रीच्या लेकीवर
 रात्रीला काळोख्यात उभ्या असतात बाहेर गावातील महिला पथदिव्याचा अभाव

महेंद्र लोखंडे,वडनेर ०८/०१/२०२६ येथे ये -जा करणाऱ्या प्रवाशांसाठी बस स्थानकाची पुरेशी सोय नसल्यामुळे एका बाजूला बस स्थानकाचे उभारणी करण्यात आली मात्र वडनेर वरून हिंगणघाट कडे जाणाऱ्या विद्यार्थी, प्रवासी व महिलांना रात्रीच्या काळोखात बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य परिवहन विभागा बाबत खेद व्यक्त करण्यात येत आहे.

वडनेर हे बारा हजार लोकसंख्येचे गाव असून येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी तसेच महिला, पुरुष विविध कामानिमित्त दररोज येत असतात बसेसचे नियोजन वेळेवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसची प्रतीक्षा करावी लागते रात्रीच्या सुमारास सर्वत्र काळोख असल्याने येथे गाव आहे की नाही? असा भास प्रवाशांना होतो आहे.

येथून आजनसरा, पांढरकवडा, राळेगाव, वरोरा, नागपूर, वर्धा या ठिकाणी जाणारे अनेक प्रवासी असतात वडनेर कडून हिंगणघाट कडे जाणाऱ्या रात्री पाळीतील प्रवाशांना येथे बसण्यासाठी बस स्थानकाची सोय नाही, सर्वत्र पथदिव्यांचा अभाव काळोखाचे साम्राज्य अशा परिस्थितीत बाहेर गावातील महिलांना
आपला जीव धोक्यात घालून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या गंभीर बाबीकडे राज्य प्राधिकरण,राज्य परिवहन यांच्यासोबतच संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन हिंगणघाट कडे जाणाऱ्या बाजूला बस स्थानकाची निर्मिती करून पथदिवे लावण्याची मागणी महिला प्रवासी वर्गातून होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *