मुंबई, दि. २३ प्रतिनिधी:शुक्रवारी पुन्हा एकदा शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. गुंतवणूकदारांकडून झालेली नफा वसुली, जागतिक तणावाबाबतची चिंता, २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीची सावध भूमिका तसेच तिसऱ्या तिमाहीतील मिश्र कंपनी निकालांवरील प्रतिक्रियेमुळे ही घसरण झाली.
शुक्रवारी सेन्सेक्सने ८२,३३५ पातळीवर सुरुवात केली आणि दिवसअखेरीस ०.९४ टक्क्यांच्या घसरणीसह ८१,५३७ पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० ने २५,३४४ पातळीवर ओपनिंग दिली आणि दिवसअखेरीस ०.९५ टक्क्यांच्या घसरणीसह २५,०४८ पातळीवर बंद झाला.
या दरम्यान, एकाच सत्रात गुंतवणूकदारांना ६ लाख कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) मागील सत्रातील ४५८.५ लाख कोटी रुपयांवरून घसरून ४५२ लाख कोटी रुपयांखाली आले.
निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीजमध्ये सर्वाधिक १.४९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. त्यानंतर टेक महिंद्रामध्ये ०.८२ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये ०.८० टक्के, हिंदाल्कोमध्ये ०.६२ टक्के आणि ओएनजीसीमध्ये ०.६० टक्क्यांची वाढ झाली.
तर निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेसला सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या शेअरमध्ये १०.६५ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय अदानी पोर्ट्समध्ये ७.४९ टक्के, इंटरनलमध्ये ६.२४ टक्के, इंटरग्लोबमध्ये ४.१७ टक्के आणि सिप्लामध्ये ४.०५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.




