स्थायी समिती अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडे
गटनेत्यावरून चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये विकोपाला गेलेला अंतर्गत वाद महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलाजी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीतून मिटला आहे. चंद्रपूर महापालिकेत खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर विराजित होणार असून चंद्रपूर मध्ये जे समर्थन देतील त्यांना उपमहापौर पद देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलाजी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची बैठक पार पडली. या बैठकीतून चंद्रपूरचे महापौर पद हे प्रतिभा धानोरकर गटाकडे देण्यात येईल व प्रदेशाध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार गटनेता ठरविण्यात येईल असा निर्णय झाला. निर्णयानुसार स्थायी समिती अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडे दिल्या जाणार आहे.
चंद्रपूर महापालिकेमध्ये 34 हा बहुमताचा आकडा मिळविण्यासाठी चार नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा बहुमताचा आकडा जुळविण्याची जबाबदारी प्रतिभा धानोरकर यांच्याकडे राहणार आहे. काँग्रेस मधील 27 नगरसेवकांपैकी तेरा नगरसेवकांचा पाठिंबा प्रतिभा धानोरकर यांना आहे तर 14 नगरसेवकांचा पाठिंबा विजय वडेट्टीवार यांच्याकडे आहे.
गटनेतासाठी बहुमताचा आकडा आपल्याकडे असल्याचा दावा, प्रतिभा धानोरकर
गटनेत्यासाठी बहुमताचा आकडा आपल्याकडे असल्याचा दावा प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गटाचा गटनेता होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
पक्षासाठी संयमी भूमिका विजय वडेट्टीवार
गेली पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करत असताना पक्षासाठी जे योग्य तो निर्णय घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पक्षाचा नेता म्हणून संयमी भूमिका घ्यावी लागते, कोणी टीका केली, शिव्या दिल्या तरी आपले काम करावे लागते. यावेळी देखील पक्षासाठी दोन पावले मागे घेतल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांना उत्तर देताना स्पष्ट केले.
चंद्रपुरात उद्भवलेल्या स्थितीत भाजपने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून नगरसेवकांना विविध प्रलोभने दिली जात आहे. नगरसेवकांना एक कोटी रुपये, पद देण्याचे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, परिणय फुके
काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या पेचावरून भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसमध्ये मोठा पक्ष असूनही सत्ता काबीज करता न येणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांची स्थिती नाचता येईना अंगण वाकडे अशीच आहे. काँग्रेस मधील अंतर्गत कलहामुळे मतदार काँग्रेसच्या बाजूने नसल्याचे टीका परिणय फुके यांनी केली आहे.




