चंद्रपूर टॉप स्टोरी विदर्भ

चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा

धानोरकर–वडेट्टीवार यांच्यात सहमती, सपकाळ यांची मध्यस्थी यशस्वी

मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर तोडगा निघाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात शनिवारी सहमती झाली. या समझोत्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष संपुष्टात आला असून काँग्रेसची सत्ता अबाधित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सहमतीनुसार चंद्रपूर महापालिकेचे महापौर पद धानोरकर गटाकडे, तर स्थायी समिती अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे राहणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी १३ नगरसेवक धानोरकर यांच्या, तर १४ नगरसेवक वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाला मानणारे आहेत.

धानोरकर यांनी १३ नगरसेवकांसह स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याने, काँग्रेसचा महापौर निवडून येणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दोन्ही नेत्यांची बैठक घेऊन मध्यस्थी केली. बैठकीत महापालिकेतील काँग्रेस गटनेता ठरविण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांकडे देण्याचा निर्णय झाला. महापौर पदाबाबत धानोरकर, तर स्थायी समिती अध्यक्षपदाबाबत वडेट्टीवार यांनी निर्णय घ्यावा, असा समन्वयाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला. त्यामुळे काँग्रेसमधील दोन गटांतील सत्तापेच जवळपास सुटला आहे.

दरम्यान, नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “पक्षाचा नेता म्हणून संयमी भूमिका घ्यावी लागते. कोणी टीका केली, शिव्या दिल्या तरी पक्षासाठी काम करावे लागते. यावेळीही पक्षाच्या हितासाठी दोन पावले मागे घेतली आहेत.”

दरम्यान, परभणी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना पाठिंबा दिल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा मिळावा, यासाठी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने, दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय आणि संवादात कोणतीही अडचण नसल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *