अकोला प्रशासन आता ‘हायटेक’! पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘डॅशबोर्ड’ आणि ‘चॅटबॉट’सह विविध सेवांचा दिमाखदार शुभारंभ
प्रजासत्ताक दिनी अकोल्याला आधुनिक सेवांची भेट; नागरिकांना घरबसल्या मिळणार शासकीय योजनांची माहिती
अकोला | प्रतिनिधी:वॉररूम, डॅशबोर्ड आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता येईल आणि सर्वसामान्यांना अचूक माहिती वेळेत मिळेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध लोकपयोगी सेवा-सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
एका क्लिकवर जिल्हा: व्हॉट्सॲप चॅटबॉटची सुविधा
प्रशासनाला जनतेच्या थेट दारी नेण्यासाठी ‘अकोला जिल्हा व्हॉट्सॲप चॅटबॉट’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 8799952158 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आता नागरिकांना सर्व शासकीय योजना आणि सेवांची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यामुळे माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
प्रशासनावर ‘वॉच’ ठेवणार जिल्हा डॅशबोर्ड
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘जिल्हा डॅशबोर्ड’चेही यावेळी लोकार्पण झाले. या प्रणालीमुळे शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, हे नागरिकांना स्वतः जाणून घेता येणार आहे. सुशासनाच्या दिशेने हे अकोला प्रशासनाचे मोठे पाऊल मानले जात आहे.
वॉररूम आणि शैक्षणिक गुणवत्ता
वॉररूम: आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा आता सज्ज झाला असून, ग्रामपातळीपासून ते जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांना तात्काळ संपर्क साधणे शक्य होणार आहे.
शैक्षणिक ॲप: ‘मिशन एक्सलन्स’ अंतर्गत ‘टार्गेट पीक’ या शैक्षणिक ॲपचा शुभारंभ झाला. यामुळे जिल्हा परिषद आणि मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
सौर ऊर्जा प्रकल्पाने वीज खर्चात होणार बचत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर बसवलेल्या १५० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे कार्यालयाच्या विजेवरील खर्चात मोठी बचत होणार असून, प्रशासनाने पर्यावरणपूरक पाऊल उचलले आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
यावेळी राज्याच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरल्याबद्दल अर्चित चांडक यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. सोबतच निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा सूचना अधिकारी अनिलकुमार चिंचोले आणि ऋषिकेश आग्रे यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला आमदार वसंत खंडेलवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्यासह जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
—
Deepak Kaitke




