टॉप स्टोरी महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या ‘पॉवर हाऊस’चा अखेरचा प्रवास; बारामतीच्या मातीत ‘दादा’ विसावले! पुन्हा असा प्रशासक होणे शक्य आहे का?

बारामती | विशेष प्रतिनिधी:ज्या बारामतीने अजित पवारांना ताकद दिली, त्याच बारामतीच्या मातीत आज एका झंझावाताचा अंत झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. सकाळपासूनच बारामतीकडे जाणारे सर्व रस्ते जनसागराने ओसंडून वाहत होते. आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक डोळा पाणावलेला होता आणि आसवांनी भिजलेली बारामती आज पूर्णपणे सुन्न झाली होती.

राजकीय मतभेद बाजूला; नेत्यांच्या डोळ्यांतही पाणी!
एरव्ही राजकीय मैदानात एकमेकांवर तुटून पडणारे नेते आज एकाच व्यासपीठावर दु:खात बुडालेले दिसले.

देशाची श्रद्धांजली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केंद्र सरकारतर्फे आदरांजली वाहिली.
सहकाऱ्यांचा टाहो: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार्थिवाला खांदा देताना आणि श्रद्धांजली वाहताना आपले अश्रू रोखू शकले नाहीत. ‘आमचा एक हात तुटला’ अशी भावना राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली.
कौटुंबिक एकोपा: शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण पवार कुटुंबाचे सांत्वन केले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही अंत्यविधीला उपस्थित राहून ‘दादा’ हे महाराष्ट्राचे कसे होते, हेच अधोरेखित केले.
मानवंदना आणि ‘एकच वादा’च्या घोषणा
दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून पूर्ण शासकीय इतमामात मानवंदना दिली. बिगुल वाजला आणि आसमंत “अजित दादा अमर रहे”च्या घोषणांनी भरून गेला. पार्थ आणि जय पवार यांनी जेव्हा मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि एकच टाहो फोडला गेला.

आता ‘दादा’ ही हाक कोणाला मारणार?
आज केवळ एक राजकीय नेता गेला नाही, तर सामान्य माणसाचा, कार्यकर्त्याचा आणि अधिकाऱ्यांचा हक्काचा आधारस्तंभ कोसळला आहे. मंत्रालयात सकाळी सहा वाजता कामाला लागणारा आणि फाईलवरचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणारा हा ‘अजितपर्वा’चा योद्धा आता अनंतात विलीन झाला आहे. बारामती आज पोरकी झाली आहे आणि महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *