– कमलनयन बजाज स्मृती आंतर-विश्वविद्यालयीन परिसंवाद
वर्धा : “जीवनात मूल्य, तत्त्व कायम असतात तर तंत्र सातत्याने बदलत जातात. व्यक्ती मूल्य विसरला की, सर्वच हातून निसटून जाते. सद्यस्थितीत संस्कृती, तत्त्व आणि मूल्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आता समाज भीतीयुक्त प्रीतीत दिसतो पण, बापूंनी प्रीतीयुक्त भीती निर्माण केली होती. सत्य बोलण्यासाठी अभय आवश्यक आहे मात्र, आता ते दिसत नसल्याने या सर्वावर महात्मा गांधी हा एक कायमस्वरूपी उपायच नाही तर वैश्विक गरज आहे, असे प्रतिपादन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले. सोबतच त्यांनी ५० वर्षे परिसंवादात सातत्य ठेवण्यासाठी मूल्य व परंपरा आवश्यक आहे, असे सांगून शिक्षा मंडळाचे कौतुकही केले.
शिक्षा मंडळाच्यावतीने स्व. कमलनयन बजाज यांच्या स्मृतिदिनानिमित्त बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पिपरी-वर्धा येथे आयोजित ५० व्या कमलनयन बजाज स्मृती आंतर-विश्वविद्यालयीन परिसंवादाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या विचारपिठावर शिक्षा मंडळाचे अध्यक्ष श्री. शेखर बजाज, सभापती श्री. संजय भार्गव, सहसचिव श्रीमती वसुधा वनमाली, अधिष्ठाता आनंद काळे, गो. से. वाणिज्य महाविद्यालय, नागपूरचे प्राचार्य डॉ. प्रवीण मस्तूर, गो. से. वाणिज्य महाविद्यालय वर्ध्याच्या प्राचार्या डॉ. अरुंधती निनावे, बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिपरीचे प्राचार्य डॉ. नरेंद्र कान्हे व परिसंवादाच्या समन्वयक डॉ. स्नेहल खडगे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून श्री. संजय भार्गव म्हणाले की, “आपला देश कसा चालतो यापेक्षा कसा चालवा यावर आपला भर असला पाहिजे. आपली परंपरा, मूल्य व संस्कृती जोपासनं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच मूल्य आणि संस्काराची शिकवण या संस्थेतून दिली जाते. आपल्या संस्कृतीच्या जोरावर भारताचे आजही जगात नावलौकिक आहे. वर्धा ही एक अशी भूमी आहे की, जिथून स्वातंत्र्याचा इतिहास कळतो, आज याच भूमीत आपण एका विचारपिठावर एकत्र आल्याने त्यांनी सर्वांचे कौतुकही केले. त्यानंतर शिक्षा मंडळचे अध्यक्ष श्री. शेखर बजाज यांनी बापूंच्या विचारसरणीचा बजाज परिवारावर असलेला प्रभाव कथित केला. तसेच आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे रोजगाराचा प्रश्न उभा ठाकणार असल्याने कौशल्यपूर्ण पिढी घडविण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी केवळ स्पर्धक नसून ते परिवाराचा एक भाग झाल्याचेही सांगितले.
‘का गांधीजी आजही जिवंत आहे?’ या विषयावरील परिसंवादात ४१ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकता, वारानसी, उत्तराखंड, झारखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, बनारस यासह भारतातील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. अंतिम फेरीत २१ स्पर्धकांनी बाजू मांडली. त्यांच्या परीक्षणाची जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अधिवक्ता श्री. देऊल पाठक, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव श्री. विजय तांबे आणि लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत वानखेडे यांनी सांभाळली.
“गांधीजी हे सृजनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी येथीलच संस्कृतीचा शोध घेऊन जिवंतपणा आणला जो तेव्हा, आता आणि पुढेही कायम राहणार आहे; म्हणून गांधी आजही आवश्यक आहे. त्यांचे दर्शन आपल्याला वाचाण्यातून नाही तर प्रत्यक्ष जगण्यातून घडते. गांधीजींचे विचार त्रिकालाबाधित सत्य असून ते आपण आत्मसात करावे” असा मौलिक सल्ला परीक्षकांनी दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन परीसंवादाच्या समन्वयक डॉ. स्नेहल खडगे यांनी केले. यशस्वीसाठी शिक्षा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व समितींच्या सदस्यांनी सहकार्य केले.
——————————————————————————————————
राष्ट्रीय परिसंवादात या स्पर्धकांनी मारली बाजी
राष्ट्रीय परिसंवादात इंग्रजी भाषेतून प्रथम पुरस्कार तमन्ना दलाल, दिल्ली विद्यापीठ दिल्ली; द्वितीय पुरस्कार वृद्धी हरिया, सेंट पॉल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज, इंदोर; व तृतीय पुरस्कार जिबीन बिज्जू, डॉ. एनटीआर विद्यापीठ, विजयवाडा, यांना देण्यात आला. हिंदी भाषेतून प्रथम पुरस्कार हिमाशु जिंदाल, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब; द्वितीय पुरस्कार भूमिका चौबे, बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा; तृतीय पुरस्कार रौनककुमार मिश्रा, विनोबा भावे विद्यापीठ, हजारीबाग आणि प्रोत्साहनपर पुरस्कार श्रावणी रोटे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांना देण्यात आला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी स्पर्धकाचे कुंकू तिलक लाऊन आणि सूतमाला घालून स्वागत केले.




