थर्ड अंपायर

पवार परिवार अन् राजकारण

(जयंत महाजन) राजकारण कसं करावं व कुटुंब किंवा परिवार कसा सावरावा हे बारामतीच्या पवार परिवाराकडूनच महाराष्ट्राने शिकले पाहिजे. राजकीयदृष्ट्या एकमेकांशी मतभेद असले तरी कुटुंब म्हणून सारेजण कसे एकच असतात, हे वाखाण्यासारखे आहे. अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राला त्या सर्व एकतेचे दर्शनही झाले. अजितदादा पवारांचे अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत खा. सुप्रियाताई सुळे यांचा धैर्यपूर्ण वावर महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील. खासदार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लोकसभेची लढाई करूनही त्यांच्याबरोबर धीर देण्यासाठी सावली सारख्या सुप्रियाताई उभ्या राहत होत्या. ते चित्र महाराष्ट्राला कमालीचे भावले.

पवार परिवार व राजकारण यांची ते कधीच गल्लत करीत नाही, हा संदेश लोकांपर्यंत बरोबर पोहोचला. एका बाजूला शरद पवारांच न थकणारं, झुकणारं आयुष्य व दुसऱ्या बाजूला पवार परिवारावर नियतीचा क्रूर आघात उभ्या महाराष्ट्राने गेल्या दोन तीन दिवसांपासून अनुभवला. शरद पवारांच उभं आयुष्य पाहिलं, तर ते केवळ यशाची मिरवणूक नाही; ते संघर्ष, संयम, सहनशीलता आणि मौनातून घडलेलं नेतृत्व आहे.

असंख्य उतार-चढावांनी भरलेलं हे आयुष्य, तरीही आतून स्थिर, शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारं हेच त्यांच खरं वैशिष्ट्य आजपर्यंत दिसून येत आहे. सामान्य माणसाला ज्या गोष्टी सहन करणं अशक्य वाटेल, त्या शरद पवारांनी गप्पपणे सहन केल्या. अपमान, आरोप, राजकीय डावपेच, कौटुंबिक वादळं असो, प्रत्येक वेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीला सामोरं जाणं पसंत केलं. कारण त्यांच्या आयुष्यात शांतता ही कमजोरी नव्हे, तर ताकद होती. स्वतःच्या पुतण्याला, स्वर्गीय अजितदादांना, वडिलांसारखा आधार देत राजकारणात उभं करणारा हा माणूस, जेव्हा त्याच पुतण्याने कोणत्या का कारणाने का होईना राजकारणातील वेगळी वाट धरली, तेव्हा पवारांनी शब्दांनी नाही तर मौनाने उत्तर दिलं.

कुठलाही आक्रोश नाही, कुठलीही टीका नाही, फक्त आलेल्या क्षणाला सामोरं जाण्याची तयारी हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण ठरले. शरद पवार यांचा पक्ष व अजितदादा पवार यांचा पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच अजित पवारांच्या अकाली, अनाकलनीय, दुर्दैवी निधनामुळे पवारांवर कोसळलेला हा आघात उभ्या महाराष्ट्राने पाहीला. त्यांना इतकं खचलेलं आजवर कुणीच कधीच बघितलेलं नव्हतं. कारण त्यांचे कातरलेले शब्द, पाणावलेले डोळे, घोगरा आवाज, भावनांना बांध घालण्याचा अयशस्वी केलेला प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्र पहात होता व दु:खी कष्टी झाला होता.

दादांच्या धक्कादायक निधनानंतर माध्यमांसमोर खचलेले कुटुंबप्रमुख बघतांना कुटुंबावरील आघाताची कल्पना येते. कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, अशीच प्रार्थना मनातून उमटत होती. बारामतीकडे जाताना किंवा अपघात स्थळी जाताना दिसणारा त्यांचा निर्विकार चेहरा, वेदना लपवणारा नसून त्यागाने स्वीकारलेला होता. दुःख झेलतानाही चेहऱ्यावर संयम राखणं, हे फक्त दिव्यत्व प्राप्त झालेल्यांनाच जमतं. तेच पवारांच्या आयुष्याचं गमक आहे. माणसाचं आयुष्य अनिश्चित, क्षणभंगुर आणि पुढच्या एका मिनिटाचाही भरवसा नसलेलं असतं. सरते शेवटी मृत्यू हे अटळ आणि अंतिम सत्य आहे, मग तो कधी, कुठे, कसा येईल याची कुणालाच कल्पना नसते.

अजितदादा पवार माणूस आणि नाव या दोन्ही गोष्टी भक्कम आणि रोखठोक. एक वेगळाच दरारा, पण कर्माचं बोलावणं आल्यावर जावं लागलं. ऐश्वर्य-संपन्न आयुष्य जगलेला, राजकीय पातळीवर सत्ता आणि दबदबा असलेला, एक रंगतदार, प्रभावी आणि ठाम व्यक्तिमत्त्व. अखा महाराष्ट्र हादरवून सोडणारा, कामात कमालीची तत्परता असलेला, ज्याच्या राजकीय प्रवासाकडे पाहून शत्रूलाही हेवा वाटावा असा माणूस. पण वेळ आली आणि परतीच्या प्रवासाला निघावं लागलं. कारण मृत्यू हेच अंतिम आणि निर्विवाद सत्य, त्यात बदल नाही. तुम्हा-आम्हांकडे कोणतंही मोठं पद असो, कितीही अमाप संपत्ती असो, कितीही मोठी प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी असो, पण एकदा का दैवाने वेळ ठरवली, की तिथे कुणाचंच काही चालत नाही. लोकं स्वतःला फार प्रभावी समजतात किंवा दैनंदिन जीवन जगत असताना फार अभिमानाने किंवा गर्वाने वागत असतात, त्यांना एक सांगावं वाटत की आज जो माणूस विमान अपघातात गेला आहे, त्यांची बरोबरी या जन्मात तर नक्कीच शक्य नाही!

बारामतीचं पवार कुटुंब हे देशातील एक आगळंवेगळं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे शरद पवार. गेली साठ वर्षे राजकारणाच्या रणभूमीवर अखंड लढणारा हा कर्मवीर, केवळ नेता नाही; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा जणू ‘जाणता राजा’. तो पवार कुटुंबाचा ऐवज आहे, बारामतीच्या मातीचा अभिमान आहे. खरंतर पवारांचं आयुष्य म्हणजे जगण्याचं एक तत्त्वज्ञान आहे. जग आपल्याकडून सतत काही ना काही मागत असते. कधी तडजोड, कधी गप्प राहणं, कधी हसणं, तर कधी आपण आहोत त्यापेक्षा वेगळं बनणं. दररोज या माणसाला कुठल्या ना कुठल्या भूमिकेत शिरावं लागतं. चांगला मुलगा, समजूतदार मुलगी, यशस्वी माणूस, कणखर पुरुष, या सगळ्यात खरा माणूस मात्र अनेकदा मागे पडतो. म्हणूनच जगात राहणं जड वाटतं. इथे जगावं लागत नाही, इथे निभावं लागतं.

पवारांनी हे निभावणं आयुष्यभर केलं. प्रत्येक गोष्ट मनावर न घेणं, प्रत्येक जखम दाखवणं नाही आणि प्रत्येक सत्य बोलणंही नाही हे त्यांनी शिकून घेतलं. जग आणि मनाची लढाई त्यांच्या आयुष्यात कायम सुरू राहिली. या ओढाताणीत माणूस थकतो आणि तो थकवाही हसण्यात लपवतो. पवारांनीही तेच केलं. पण स्वतःला हरवू दिलं नाही. जग आपल्याला हळूहळू माणसातून “सिस्टम” बनवतं. संवेदनशीलतेला कमजोरी, प्रामाणिकपणाला मूर्खपणा आणि शांततेला पराभव म्हटलं जातं. तरीही पवारांनी आपल्या आतल्या माणसाला जपलं. हीच त्यांची सगळ्यात मोठी लढाई होती आणि विजयही.

पोलादी पुरुषांच्या आयुष्यातही वादळं येतात. पण त्या प्रत्येक वादळातून शांतपणे पुढे जाणारा असा माणूस या युगात झाला नाही आणि होणारही नाही, कधीच नाही. अलौकिक महात्म प्राप्त झालेल्या पवारांकडून उभ्या महाराष्ट्राला जणू शिकायला मिळालं. अजितदादांच्या निधनामुळे अनेक गोष्टींचा उलगडा आपोआप होत गेला. सुप्रियाताई माणूस म्हणून किती मोठ्या आहेत, याचं जिवंत उदाहरण त्यांनी या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं. ‘फॅमिली फर्स्ट’ हे ब्रीदवाक्य केवळ त्या म्हणत नाहीत, तर संकटाच्या काळात कृतीतून जगून दाखवतात.

या दोन–तीन दिवसांच्या घडामोडींमध्ये त्यांनी दाखवलेला संयम, धैर्य आणि कणखरपणा खरंच कौतुकास्पद आहे. कुठलाही माणूस अशा प्रसंगी पूर्णपणे कोलमडून जाऊ शकतो, कुठेतरी एकट्यात बसून अश्रू ढाळू शकतो; पण सुप्रियाताईंनी स्वतःच्या दुःखावर मात करत कुटुंबासाठी ढाल बनून उभं राहणं पसंत केलं. एक बहीण म्हणून त्यांनी अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक बळ दिलं, एक आत्या म्हणून दादांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत भीती न राहू देता त्यांना धीर दिला आणि एक कन्या म्हणून स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांना खंबीरपणे सावरलं. या सगळ्या भूमिका त्यांनी एकाच वेळी न थकता, न डगमगता निभावल्या.

राजकारण बाजूला ठेवलं तरी, माणूस म्हणून दाखवलेली ही उंची खूप काही शिकवणारी आहे. संकट आलं की जबाबदारीपासून पळ काढणं सोपं असतं; पण त्या प्रसंगाला छातीशी धरून, धैर्याने सामोरं जाणं हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे आणि अशी भूमिका निभावणं सोपं नसत. यासाठी लागतो मनाचा कणखरपणा, नात्यांवरची नितांत श्रद्धा आणि जबाबदारीची खोल जाणीव. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी जे दाखवलं, ते म्हणजे खऱ्या अर्थाने माणूसपण. संकट आलं की अनेकजण तुटतात, नाती सैल होतात; पण सुप्रियाताईंनी दाखवून दिलं की संकट हे मोडण्यासाठी नसतं, तर अधिक घट्ट होण्यासाठी असतं. एक धाडसी रणरागिणी म्हणून त्यांचा हा वावर प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं, तरी न डगमगता उभं राहणं, कुटुंबाला एकत्र ठेवणं आणि परिस्थितीवर मात करणं हे सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं.

रडीचा डाव

तुला ना देवा
पहावतच नाही,
‘मराठी’ वैभव
रूचतच नाही.

‘महाराजां’ना देखील
अवेळीच हेरलं,
‘शंभूराजा’स तू देवा
गनिमाहाती छळलं.

भाऊकिच्या डावातून
‘प्रमोद’ हिरावला,
दिलदार खानदानी
‘विलास’ही तू घेरला.

मराठी प्रज्ञेची तुला
देवा चिडच दिसते,
‘जिचकार’ आणि ‘मुंडें’ची
अस्थी अजून धगधगते.

तुझ्याशिवाय कुणी
‘अजित’ असूच नये का?,
चांद्यापासून बांद्यापर्यंतचा
कामाचा ‘दादा’ होवू नये का ?

मराठी कर्तृत्वाचा देवा
आज तू नासिवला भाव,
विमानाच्या आडून
खेळलास रडीचा डाव.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *