थर्ड अंपायर

महाराष्ट्रातील महायुती शासनाचे चौथे अभिजन विश्व मराठी संमेलन

मराठी विश्वसाहित्य, स्त्री लेखिका आणि ‘आयकॉन’ राजकारण : एक चिकित्सक विचार

(जयंत महाजन) विश्व मराठी साहित्य संमेलन २०२६ हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो जगभर विखुरलेल्या प्रत्येक मराठी मनासाठी “घरी परतल्याचा” भावस्पर्शी अनुभव आहे. आपल्या समृद्ध परंपरा, वैभवशाली साहित्य, विविधांगी कला, उद्योजकता आणि महाराष्ट्राच्या जिद्दी वृत्तीचा एकत्रित उत्सव साजरा करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन मराठी अस्मितेचा हा जागतिक सोहळा अभिमानाने साजरा करायलाच पाहीजे यात दुमत नाही. मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे यांनी याबाबतीत पुढाकार घेतला व संस्थेने सरकारला केलेले सहकार्य हे देखील विसरता येणार नाही.

या संमेलनात परंपरागत लावणी, लोकनृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या रंगतदार मेजवानीपासून ते मराठी भाषेच्या भविष्यावर होणाऱ्या सखोल बौद्धिक परिसंवादांपर्यंत हा चार दिवसीय महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंत, विचारवंत, साहित्यिक आणि कलावंतांना एका व्यासपीठावर एकत्र आणणारा भव्य सांस्कृतिक संगम ठरणार आहे. जगभरातील मराठी समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा, साहित्यिक वैभवाचा आणि उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरव साजरा करण्यासाठी लोक एकत्र येतील. त्यामुळे आपल्या अस्मिता, परंपरा आणि अभिमानाचा हा भव्य उत्सव साजरा करतांना सर्वांना आनंद होणार आहे. पण या संमेलनाच्या निमित्ताने काही प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली पाहिजे.

मराठी विश्व संमेलना निमित्त ती बाजू मांडणे गरजेचे वाटते एक मराठी म्हणून. कारण गेल्या पाच वर्षात मराठी ज्ञान कोशात एकही नवीन शब्दाची भर पडली नाही. उलट पक्षी अनेक शब्दांचा ऱ्हास होताना दिसतंय हे दुर्दैव मराठी भाषेचे. भाषा समृद्ध होते ती नवनवीन शब्दांच्या भरतीने आणि अभिजन म्हणून आपण कितीही तिचा उल्लेख करत बसलो तरी ते समृद्ध होण्यासाठी अभिजनांकडेच तिची मक्तेदारी असणे गरजेचे नसते. आजच्या सांस्कृतिक वातावरणात साहित्याचे व्यासपीठ अनेकदा विचारधारांच्या सावलीत उभे दिसते. “विश्वसाहित्य” ही संकल्पना मुळात व्यापकतेची, समावेशकतेची आणि बौद्धिक प्रामाणिकतेची आहे; परंतु तिच्या भोवती जेव्हा प्रतिमा-राजकारण उभे राहते, तेव्हा प्रश्न निर्माण होतात.

मराठी साहित्यविश्वात स्त्री लेखिकांचे योगदान अत्यंत भक्कम आहे. दुर्गा भागवत, इरावती कर्वे यांनी लोकसंस्कृती, निसर्ग आणि तत्त्वचिंतन यांना वैचारिक अधिष्ठान दिले. शांता शेळके यांच्या कवितांत स्त्रीमनाची कोमलता आणि सार्वत्रिक भावविश्व प्रकट झाले. इरावती कर्वे यांनी युगांता सारख्या ग्रंथातून पुराणकथांना आधुनिक मानवशास्त्रीय दृष्टी दिली. या तिघींसह अनेक स्त्री लेखिकांनी मराठी भाषेला विचारांची उंची, भाषिक सौंदर्य आणि तत्त्वचिंतनाची खोली दिली. तरीही मोठ्या सांस्कृतिक संमेलनांच्या जाहिरातींमध्ये, अधिकृत पोस्टर्समध्ये किंवा प्रतिमांच्या निवडीत त्यांची उपस्थिती अत्यल्प दिसते. हा केवळ योगायोग आहे का? की आपल्या सांस्कृतिक धोरणातील दडलेला पूर्वग्रह? महिलांच्या सक्षमीकरणाच्या या कालावधीत त्यांची अवस्था केविलवाणीच वाटते.

संमेलन की औपचारिकता?

राज्य शासन आयोजित “मराठी विश्व संमेलन” जर केवळ खर्चाचा ताळेबंद आणि औपचारिकता बनत असेल, तर ते चिंताजनक आहे. वैचारिक कार्यक्रमांत जर एकाच विचारप्रवाहातील वक्ते आणि सहभागी असतील, तर विविधतेचा आत्मा हरवतो. ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्याने मराठी विश्वाला नवा आयाम दिला आहे. अनेक अभ्यासू लेखक आजही ग्रामीण जीवनाच्या भाषिक आणि सांस्कृतिक गुंतागुंतीचा सखोल अभ्यास करीत आहेत. दलित साहित्य बदलत्या सामाजिक समीकरणांना नवे परिमाण देत आहे. जर या सर्व प्रवाहांचा सहभाग संमेलनात दिसत नसेल, तर तो केवळ नियोजनातील त्रुटी नसून बौद्धिक मर्यादेचे लक्षण ठरते.

विश्वसाहित्याचा निकष आणि आयकॉन राजकारण

जागतिक स्तरावर मराठी साहित्याचा उल्लेख करताना वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, कानिटकर व भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचा अनुवाद, अभ्यास आणि समीक्षण आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले दिसते. यांच्या तुलनेत विनायक दामोदर सावरकर यांचे लेखन मुख्यतः राष्ट्रवादी आणि वैचारिक भूमिकांसाठी ओळखले जाते. त्यांच्या साहित्यिक मूल्यमापनाबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. तथापि, विशिष्ट विचारधारांच्या अधोरेखेसाठी त्यांना सांस्कृतिक “आयकॉन” म्हणून उभे करण्याचा प्रयत्न दिसतो, तो चुकीचा आहे.
जर “विश्वसाहित्य” या चौकटीत एखाद्या व्यक्तीचे स्थान केवळ राजकीय गरजेतून ठरवले जात असेल, तर ते साहित्याच्या कसोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

प्रतिनिधित्वाची अपेक्षा

“विश्व” हा शब्द व्यापकतेची हमी देतो. त्यात स्त्री, दलित, ग्रामीण, शहरी सर्व आवाजांना स्थान हवे.
साहित्य म्हणजे गौरवगाथा नव्हे; तो समाजाचा आरसा, प्रश्न विचारणारा आवाज आणि भाषेचा उत्सव आहे. जर संमेलनात एकाच विचारप्रवाहाची नावे ठळक दिसली आणि इतर प्रवाह दुय्यम ठरले, तर तो केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून प्रतिमा-राजकारण ठरते. अंतिम विचार म्हणजे “विश्वसाहित्य” व्यक्तिपूजेवर उभे राहत नाही.
ते उभे राहते भाषेच्या सर्जनशीलतेवर, मानवी अनुभवांच्या व्यापकतेवर आणि विचारांच्या सार्वत्रिकतेवर. स्त्री लेखिकांचे योगदान दुर्लक्षित करून किंवा राजकीय गरजेनुसार आयकॉन निर्माण करून साहित्याची उंची वाढत नाही, तर ती संकुचित होते. मराठी विश्वसाहित्याचा खरा सन्मान करायचा असेल तर प्रतिमा नव्हे, लेखन बोलू द्या. विचारधारा नव्हे, गुणवत्ता निकष ठरू द्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व आवाजांना समान स्थान द्या. तेव्हाच मराठी विश्वसाहित्य खऱ्या अर्थाने “विश्व” बनेल.

ग्रंथालयातून ‘विश्व’कडे

पर्यटनप्रिय मराठीचा एक उपरोधिक प्रवास सुरू झाला आहे. पूर्वी एक काळ होता. ग्रंथालयात माणसं खरोखर पुस्तक वाचायला जायची. पुस्तक घ्यायचं, घरी न्यायचं, डोळे लाल होईपर्यंत वाचायचं आणि वेळेवर परत द्यायचं. तो एक “वरद” काळ होता म्हणे! आज ग्रंथालयं मात्र शांतपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत नव्हे पडली आहे. शासन ग्रंथपालांची नेमणूकच करत नाही. वाचक नाहीत, धूळ आहे; ग्रंथपाल आहेत, पण गाठीशी वाचक नाहीत. आता काळ बदललाय वाचनाची जागा “इव्हेंट”ने घेतली आहे. पुस्तकापेक्षा पोस्टर मोठं झालं आहे.

विश्वसंमेलन : साहित्य की पर्यटन?

आता “मराठी विश्व संमेलन” आहे. विश्वाच्या नकाशावर मराठीचा झेंडा रोवायचा आहे.
(कुठे रोवायचा, कसा रोवायचा ते मात्र अजून ठरायचं आहे.) निमंत्रण पत्रिका उघडली की एक विशिष्ट ओळख डोकावते. सहभागी व्यक्तींच्या परिचयावरून विचारधारेची दिशा स्पष्ट होते. त्या विचारप्रवाहाची छाया सर्वत्र जाणवते, असे अनेकांना वाटते. आता साहित्याचा कार्यक्रम असो वा सांस्कृतिक सोहळा विचारधारा नसती तर कार्यक्रमाला उंचीच कशी येणार? आम्ही मात्र साधी माणसं. आम्हाला आता पर्यटनाची सवय लागली आहे. संमेलन असो किंवा सिटी सेंटर मॉलला फेरफटका असो किंवा डोंगरे वस्तीगृह प्रांगण मधील एखादं प्रदर्शन असो, आमच्यासाठी सगळं “आऊटिंग”च! मराठी विश्व संमेलनाला फक्त ठिकाण बदललंय. केटीएचएम कॉलेज एवढं मात्र नक्की. भाषेचा विकास, अनुवाद धोरण, जागतिक प्रसार, डिजिटल प्लॅटफॉर्म, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संवाद हे विषय थोडे जडच वाटतात.
आमचं साधं तत्त्वज्ञान आहे, गर्दी झाली की कार्यक्रम यशस्वी! फोटो आले की भाषा जागतिक!

विश्वपातळीवरची स्वप्नं

मराठीला विश्वपातळीवर न्यायचं म्हणे. छान आहे. पण त्यासाठी अनुवाद प्रकल्प, संशोधन निधी, आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवांशी संबंध, परदेशी विद्यापीठांत अभ्यासक्रम या गोष्टींची चर्चा फारशी ऐकू येत नाही. पण काळजी नको, गर्दी मात्र होईल. सेल्फी, स्टेटस आणि उद्घाटनाचे टाळ्या वादन यात कमी पडणार नाही. संयोजकांनी निर्धास्त राहावे, यजमानांनी बिनधास्त राहावं.
आम्ही येणारच मराठी म्हणून, एक कर्तव्य म्हणून
आणि थोडंसं पर्यटन म्हणूनही. उद्या परवा सुद्धा आम्ही येऊ, गर्दी वाढवू, संमेलनाची “उंची” वाढवू.
नाहीतरी आम्हा नाशिककरांना शनिवारी रविवारी मिसळ वरती दिवस काढण्याची सवय लागलेलीच आहे मिसळ राजधानी म्हणून. मराठी भाषा वैश्विक झाली नाही तरी चालेल, पण कार्यक्रम भव्य झाला पाहिजे हे मात्र निश्चित! शेवटचा नम्र उपरोध म्हणजे पूर्वी लोक पुस्तक वाचायला ग्रंथालयात जात. आज सामान्य लोक कार्यक्रम बघायला संमेलनात जातात. फरक एवढाच पूर्वी पुस्तक हातात असायचं, आज निमंत्रणपत्रिका डीजीटली हातात आहे. आणि हो हे सगळं लिहूनही मी पर्यटन म्हणून मराठी विश्व संमेलनाला हजेरी लावणारच. मविप्रच्या प्रांगणात होणारे हे संमेलन आमच्यासाठी प्रेरणास्त्रोतच ठरणार आहे. त्यामुळे त्या पवित्र जागेतील संमेलन यशस्वी व्हावे ही मनापासून इच्छा आहे. त्यासाठी नितीन ठाकरे यांच्यासह उदय सावंत व येणाऱ्या पाहुण्यांना शुभेच्छा दिल्यास पाहिजे. कारण शेवटी मी मराठी आहे आणि मराठी जिवंत राहण्यासाठी गर्दीत उभं राहणं हेच आजचं सर्वात मोठं सांस्कृतिक योगदान आहे आणि तेही बेंबीच्या देठापासून निभावणार
आणि हो मराठी साहित्य, विश्व मराठी संमेलन वादग्रस्त न होणं म्हणजे जरा चुकल्या सारखं वाटू नये म्हणून हा लेख प्रपंच!

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *