अकोटमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेतील KYC अनियमिततेविरोधात युवक काँग्रेसच्या वतिने निवेदन
अकोट : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेमध्ये होत असलेल्या अनियमितता, आर्थिक शोषण तसेच पात्र महिलांना लाभ न मिळण्याच्या गंभीर समस्येविरोधात जिल्हा युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) अकोट यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभेचे पक्षनेते अॅड. महेश भाऊ गणगणे यांच्या मार्गदर्शनात, तर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५००/- आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय असतानाही अकोट उपविभागातील अनेक महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही.
यामागे KYC प्रक्रियेमधील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनियमितता कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या वतीने असे सांगण्यात आले की, CSC सेंटर व खाजगी संगणक केंद्रांवर महिलांकडून KYC करण्याच्या नावाखाली पैसे घेतले जात आहेत. मात्र पैसे भरूनही KYC पूर्ण न होणे, कोणतीही अधिकृत पावती न देणे, तसेच “KYC पूर्ण झाली” असे सांगून महिलांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे गरीब व गरजू महिलांना वारंवार आर्थिक फटका बसत असूनही योजनेचा लाभ मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये KYC प्रक्रियेवर तात्काळ नियंत्रण ठेवणे, शुल्क घेतल्यास अधिकृत पावती देणे सक्तीचे करणे, KYC पूर्णतेचा लेखी पुरावा देणे, संबंधित केंद्रांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे तसेच पात्र महिलांना प्रलंबित लाभ तात्काळ जमा करणे यांचा समावेश आहे.
यावेळी युवा काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल वाजिद, एमएसयूआयचे अभय तेलगोटे, युवक काँग्रेसचे केशव हेंन्ड, आशिष वानखडे,नाज़िम खान आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान, या निवेदनावर आठ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




