थर्ड अंपायर

सोमय्याजीको ‘हमेशा’ गुस्सा क्यूं आता है?

पत्रकार परिषद म्हणजे ‘मेरी सुनो’ या पद्धतीने चालली, तरच त्याला पत्रकार परिषद म्हणायचे असा एक अंदाज माजी खासदार किरीट सोमय्या यांचा झालेला दिसतो. परंतु नाशिक मधील पत्रकारांनी त्यांना वठणीवर आणले म्हणून बरे झाले! अन्यथा मुंबईसह राज्यात कुठेही पत्रकार परिषद असो, पत्रकारांवर डाफरण्याचा जणू परवानाच शासनाने त्यांना दिला आहे, अशी त्यांची सतत वर्तणूक असते. सत्तेचं व सत्तेच्या परिघातील कोणतंही पद जवळ नसल्याने सध्या हिंदू-मुस्लिम विषया व्यतिरिक्त त्यांच्या हातात काही शिल्लकही राहिलेले दिसत नाही. पक्षाने देखील त्यांना जणू त्यासाठी परवानाच दिला दिल्यासारखे वाटते. अलीकडे तर बांगलादेश सोडून दुसरे प्रश्न संपल्यातच जमा झाले, असे त्यांना वाटते.

अनेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर ते सर्वजण भारतीय जनता पक्षात सामील झाले, त्यामुळे आता तोंड तरी कोणाच्या विरोधात उघडावे असे त्यांना झाले असावे. त्यामुळे अवघड प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर डाफरले तर ते घाबरतील असे त्यांना वाटले असावे. तथापि, नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकारांनी त्यांना वठणीवर आणले म्हणून त्या सर्व पत्रकाराचे अभिनंदन केलेच पाहिजे. मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांनी त्यांच्या कक्षात टिपू सुलतानचा फोटो लावल्यावरून महाराष्ट्रात सध्या वादळ उठले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बांगलादेशचा विषय घेऊन त्या विषयाला खतपाणी घालण्यासाठी ते नाशिकला आले होते. तथापि, घडलेल्या घटना पाहून त्यांना निराश होऊन पुन्हा मुंबईला जावे लागले. नाशिक महापालिकेच्या जन्मनोंदी ऑनलाईन करताना तब्बल १८ हजार नोंदी संशयास्पदरीत्या घुसवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी नाशिक मधील पत्रकार परिषदेत केला. तसेच तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यानंतर महापौर हिमगौरी आहेर यांनी बनावट जन्म दाखल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. इथपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होते. परंतु सोमय्यांची मागणी व महापौरांचे उत्तर यावरून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली अन् त्याचवेळी सोमय्यांचा पारा गगनाला भिडला. समोरचे पत्रकार म्हणजे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे त्यांनी झापायला सुरुवात केली आणि मग नाशिकच्या ‘कुंभनगरी’त भलतेच ‘रामायण’ घडले. मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरीवाले असल्याचा दावा सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेत केला. वास्तविक पाहता नाशिकच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित करणेच गैर होते. त्यामुळे पत्रकारांनी ती बाब हेरून गृह विभागाकडे ही माहिती नाही का? आजवर किती बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले? तुम्ही देत असलेली माहिती मुंबई पोलिसांकडे नाही का? अशी विचारणा केली. यावर सोमय्यांकडून उत्तर अपेक्षित होते. त्या ऐवजी त्यांनी नाशिकच्या पत्रकारांचा पानउतारा करायला सुरुवात केली. “तुमचा काही ठराविक अजेंडा आहे का? असा प्रतिप्रश्न करून पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटी पत्रकार व राजकारणी असा संघर्ष सुरू झाला. तो संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहीला!

हा संघर्ष विकोपाला पोहेचत असतांना मग पत्रकारांनीही गेल्या ११ वर्षांत किती अनधिकृत बांगलादेशींना देशाबाहेर काढण्यात आले, याचा अधिकृत आकडा विचारल्यावर सोमय्यांची अस्वस्थता अधिकच वाढली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी विषयांतर करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात दिलेला आश्रय हा परराष्ट्र धोरणाचा भाग असल्याचा दावा केला. मात्र, सततच्या प्रश्नांमुळे वैतागलेल्या सोमय्यांनी ‘मला जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ केले जात आहे’ असे म्हणत पत्रकार परिषद अचानक थांबविण्याचा निर्णय घेतल्यावर पत्रकारही भडकले. महापौर हिमगौरी आहेर यांना तर काय करावे हेच सुचेनासे झाले. किरीट सोमय्यांनी आरोप केला की, मुंबईत स्टेशनच्या बाहेर जे अतिक्रमणवाले आहेत, त्यातले ऐंशी टक्के बांग्लादेशी आहेत. यावर पत्रकारांनी विचारले की, हा अतिशय गंभीर मामला आहे. तुमच्याकडे जी माहिती आहे ती गृहविभागाकडे नाही का? यात पत्रकारांचे काय चुकले? कारण की, गेल्या बारा वर्षात उद्धव ठाकरे सरकारचा काळ वगळता गेल्या दहा वर्षापासून गृह खातं फडणवीसांकडेच आहे. गेली बारा वर्ष केंद्रात गृहखातं सलग अमित शहांकडे आहे. असं असतांना ऐंशी टक्के बांगलादेशी मुंबई ताब्यात घेत असतील तर दोन्ही गृहमंत्री अपयशी ठरले असा त्याचा अर्थ होतो. यावर उत्तर न देता सोमय्या चिडतात आणि पत्रकारांच्या हेतूवरच शंका घेतात.

यालाच दुसऱ्या भाषेत जबाबदारीशिवाय सत्ता भोगणे असे म्हणतात. ही स्टाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे, असे त्यांचे विरोधक नेहमी म्हणतात. सत्तेवर मीच आहे, पण ज्या काही घटना घडतील त्यातील दोषी आधीचे आहेत. त्यातच आपल्या प्रत्येक अपयशाचे धनी पंडित नेहरू आहेत. माझ्या बारा वर्षांचा हिशेब कुणी मागूच नये, तो हिशोब मागितला तर गांधी नेहरू यांचा कार्यकाळ लोकांपुढे आणायचा, ही मोदींची संस्कृती किरीट सोमय्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच अवघड प्रश्न येतात सोमय्यांची चिडचिड व्हायला सुरुवात झाली होती. पण जनतेला नेहमी असे वाटते की, किरीट सोमय्या नाशिकला, मालेगावला, विदर्भात व अन्य अनेक ठिकाणी जाऊन बांगलादेशींना शोधणार. मग पत्रकार परिषद घेऊन बांगलादेशी किती वाढले ते सांगणार. पण हे उद्योग करणारे सोमय्या आहे तरी कोण? त्यांच्यावर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने काही जबाबदारी दिली आहे का? सध्या ते कोणत्या संविधानिक पदावर आहे? असे प्रश्न पत्रकारांनी विचारू नये का? स्वतःच्या पक्षाची सत्ता केंद्रात व राज्यात आहे, मग त्यांनी थेट गृह मंत्रालयात जाऊन फायली बघायला सुरुवात केली तर त्यांना अडवणार तरी कोण? त्यांना जर काही तसे वाटले तर ते तिथल्या तिथं गृहमंत्री, गृहसचिवांना जाब विचारू शकतात. जर गृह विभाग त्यासाठी जबाबदार असेल, तर सोमय्यांच्याच भाषेत किंवा राज ठाकरेंच्या भाषेत ‘इतके दिवस तुम्ही काही गोट्या खेळत होता का?’ असा सरळ प्रश्न ते संबंधितांना विचारू शकतात.

पण किरीटभाऊंना असले फालतू प्रश्न सोडवण्यात मुळात रस नाही. त्यांना फक्त गावोगावी जाऊन हिंदू मुस्लिम असा भडका उडवून देण्यात रस असतो. खरं म्हणजे यालाच बेजबाबदार राज्यपद्धती असे म्हणायला हरकत नाही. सत्ता आपल्या पक्षाची असली तरी आम्हाला कोणी प्रश्न विचारू नये. ‘आम्हीच सत्ताधारी आणि आम्हीच विरोधक’ अशी ही गमतीशीर पद्धत त्यांनी सुरू केली आहे. आमची बारा वर्ष सत्ता असून आम्हीच विरोधी पक्षात असल्यासारखं दाखवणार आणि संभ्रम निर्माण करणार. या पद्धतीचा आरसा त्यांना दाखवायचा प्रयत्न केल्यावर त्यांना राग येतो. कधी कधी असे वाटते की, अप्रत्यक्षरित्या गृहखात्याचं अपयश अधोरेखित करण्यासाठी अधूनमधून बांगलादेशी वाढत आहेत, हा मुद्दा ते मुद्दामहून लावून धरतात की काय? असा प्रश्न नजरेसमोर येतो. अर्थात या अपयशाचे धनी अमित शहा देखील असणारच. कारण दिल्लीत ते बारा वर्षांपासून गृहमंत्री आहेत. पण भाजपात कोणी कोणत्या गटात रहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

नागरिकांना त्याच्याशी कर्तव्य नाही. ऐंशी टक्के बांगलादेशी असतील तर हा इतका थिल्लर मुद्दा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा व गंभीर मुद्दा आहे. पण सोमय्या त्यांचे पक्षांतर्गत हिशेब पूर्ण करण्यासाठी गावोगावी जाऊन बांगलादेशी मुस्लिमांबद्दल प्रश्न निर्माण करतात. पण बेरोजगारी, कृषी, पाणी, वीज, पर्यावरण, महिला संरक्षण या विषयांवर बोलताना या माणसाला कधीही कोणी पाहिले नाही व ऐकलेही नाही. किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार खरंच ऐंशी टक्के बांगलादेशींनी आपण व्यापले गेलो असेल, तर दोन्ही गृहमंत्र्यांकडे त्यांनी राजीनाम्यची मागणी केली, तर पत्रकार त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याहीपेक्षा हे गृहखात्याचे अपयश आहे असे त्यांनी जाहीर करावे व केंद्रीय गृहमंत्री व राज्यातील गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागावा. खरं म्हणजे गेल्या बारा वर्षातच बांगलादेशी इतके वाढलेच कसे? याचं उत्तर त्यांनीच द्यायला हवे. काँग्रेसच्या काळात निर्माण झालेली ही समस्य नाही. कारण तसे असते तर तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असतं. तसं काही घडलेलं जनतेच्या पाहण्यात आलेलं नाही. सोमय्यांनी बेजबाबदारपणे पत्रकारांवर डाफरण्यापेक्षा बांगलादेशींच्या प्रश्नावर त्यांच्या दोन्ही सरकारांनी काय उपाययोजना केली ते लोकांना सांगावं. आज नाशिकच्या पत्रकारांनी त्यांना बरोबर धारेवर धरले उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारही त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतील त्यावेळी ते असेच डाफरतील का?

सोमय्या बॅकफूटवरून पुन्हा फ्रंटफूटवर

किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी तेराव्या लोकसभा आणि सोळाव्या लोकसभेत मुंबई ईशान्य भागाचे प्रतिनिधित्व केले. भाजप शिवसेनेची युती असताना उद्धव ठाकरे यांच्या तीव्र विरोधामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ठाकरेंना आपल्या निशाण्यावर घेतले होते. यापूर्वी त्यांच्या वाहनावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोडमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काही जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे त्यांनीच सांगितले होते. सिल्लोडमध्ये आपण पोलिसांसह उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांकडे तेथील ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळेच आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. ऐनवेळी केंद्रीय औद्योगिक सरक्षा दलाचे जवान (सीआयएसएफ) धावून आल्याने मी सुखरूप जळगावपर्यंत पोहोचलो. माझ्यावर हल्ला करणारे ठाकरे गटासह काँग्रेस, एमआयएम किंवा अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते असतील, तर त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली होती. एका सेक्स सीडीप्रकरणी काही दिवस ते बॅकफुटवर गेले होते. आता बांगलादेशींचा प्रश्न हाती घेऊन पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आल्याचे दिसून येत आहे.

प्रा. जयंत महाजन
संपादक
दै. महासागर
नाशिक आवृत्ती
मो : ९४२०६९१४२०

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *