नवी मुंबई

सरसोळे बस स्थानक येथे वाहनांची अनधिकृत पार्किंग; प्रशासनाचे दुर्लक्ष

एन.एम.एम.टी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सरसोळे बस स्थानक येथे खाजगी वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात आहे

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एन एम एम टी) ला सिडकोकडून शहरांमध्ये पायाभूत सुविधा अंतर्गत अनेक बस स्थानके उपलब्ध झाली आहेत. त्यातील अनेक बस स्थानकांमध्ये नियंत्रक असल्याने तेथे बस स्थानकांची योग्य प्रकारे निगा राखली जाते; परंतु गेल्या काही महिन्यांपासून उपक्रमांमध्ये बसेस पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे काही बस स्थानकाच्या ठिकाणचे नियंत्रक रद्द करण्यात आले आहेत. त्यातील एक सरसोळे बस स्थानक आहे. या स्थानकात पूर्वी नियंत्रन चौकी तसेच पास सुविधा केंद्र देखील चालू होते; परंतु सध्या हे बंद करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या स्थानकामध्ये हे बस स्थानक आहे, की खाजगी वाहनांना पार्किंग करण्याचे ठिकाण आहे, असा प्रश्न पडावा इतक्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जात आहेत. या बसस्थानकामध्ये मोकळ्या जागेसह अगदी बस स्टॉप च्या समोर देखील वाहने पार्क केली जात आहेत. परिणामी या ठिकाणाहून ये -जा करणाऱ्या बसला अडथळा निर्माण होत आहे. या विषयी बस चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. तसेच या ठिकाणी सदर वाहनांमध्ये काही गर्दुल्ले, मद्यपी देखील असतात. परिणामी रात्रीच्या वेळी या स्थानकात उतरून घरी परतणाऱ्या महिला वर्गामध्ये भीती आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, खासगी तसेच वाणिज्य कार, गॅस सिलिंडर च्या गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जात आहे.

या प्रकरणी नेरूळ विभाग कार्यालय, वाहतूक पोलीस, एन.एम.एम.टी. प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. बस स्थानकात कशाही प्रकारे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे तसेच वाहनात लपून बसणाऱ्या गर्दुल्यांमुळे एखादी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *