बदलापूर, दि.३०,प्रतिनिधी:वाहनांवर काळ्या काचांना बंदी असताना, मात्र बदलापूरमध्ये अनेक गाड्यांना काळ्या काचा,फिती वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाहनांकडे वाहतूक विभाग आणि पोलीस का बरं डोळेझाक करत आहेत.
लहान सर्वसामान्य वाहनचालकांना नियम लावले जातात.मात्र दिग्गजांना सूट का ?असा असा सवाल उपस्थित होत आहे.
बदलापूर शहरात अनेक महागड्या वाहनांवरही काळ्या फितीचे काचे दिसतात, आणि नागरिकांचा आरोप आहे की याकडे वाहतूक पोलीस किंवा परिवहन विभाग फारशी कारवाई करत नाही.बदलापूर शहरात प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा बसवली गेली आहे, पण नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. वाहने सिग्नल उघडण्याच्या दोनतीन सेकंद अगोदरच पार होतात. यामुळे प्रामाणिक वाहन चालकांची तारांबळ उडते.
बदलापूर शहरात रस्त्यांवर वाहनांच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते अरूंद होतात आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ रस्त्यावर थांबावे लागते.बाजारातील भाग, स्टेशन जवळील भाग आणि चौकात कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. नागरिकांनी याबद्दल अनेकदा तक्रार नोंदवली आहे.
प्रशासनाने रस्त्यांचे रूंदीकरण आणि सिग्नल यंत्रणा बसवून काही ठिकाणी सुधारणा केली आहे, परंतु नियमांचे पालन अजूनही होताना दिसत नाही.
बदलापूरमध्ये वाहतुकीची कोंडी’ मोठ्या प्रमाणावर दिसून येते, विशेषतः भुयारी मार्ग बंद असल्यामुळे, रेल्वे स्टेशन आजूबाजूचा भाग, प्रमुख बाजारपेठेतील रस्ते ही कोंडीत अडकतात.कालपरवाच एक गॅस वाहून नेणारी टेम्पो बेलवली भुयारी मार्गात अडकली.त्यामुळे कोंडी झाली होती. याबाबत पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



