नवी मुंबई:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एपीएमसी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. या बाजार समिती अंतर्गत फळ, भाजीपाला, कांदा बटाटा, मसाला आणि धान्य या पाच बाजारपेठांच्या समावेश आहे. या बाजारपेठ मधील व्यापारी तसेच विविध घटक यांचे प्रतिनिधी हे विविध राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्याची वाढदिवसाची जाहिरात तसेच अन्य विविध कारणांमुळे या पाचही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात पाहिजे केली जाते.
या राजकीय जाहिरातींवर कारवाई केली जात नसल्याने सध्या वाणिज्य स्वरूपाच्या जाहिरात देखील विना परवानगी लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाची लाखो रुपयांची हानी दरवर्षी होत आहे. विशेष म्हणजे एपीएमसी प्रशासनाबरोबरच नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे विभाग कार्यालयाचे अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात होर्डिंगद्वारे विद्रुपीकरण केले जात असल्याने या अभियानांतर्गत विद्रुपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. असे असतानाही एपीएमसी आणि पालिका प्रशासन राजकीय दबावामुळे याकडे डोळे झाक करत असल्याची चर्चा आहे.


