बदलापूर

तुमच्या घरावर काळी जादू, पिशाच्च; दीड-दीड तोळ्याचे ४ खिळे लागतील… वृद्ध दाम्पत्याला मांत्रिकांनी घातला १० लाखांचा गंडा

बदलापूर, दि.९,प्रतिनिधी:घरावर काळी जादू करण्यात आली असून पिशाच्च सोडण्यात आल्याचा बनाव रचत, “दीड-दीड तोळ्याचे सोन्याचे ४ खिळे लागतील, अन्यथा संपूर्ण कुटुंबावर गंभीर संकट येईल व मुलीचा जीवही जाऊ शकतो” अशी भीती दाखवून मांत्रिकांनी एका वृद्ध दाम्पत्याची सुमारे ९ लाख ७८ हजार १०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील देवनार, गोवंडी भागातील ६७ वर्षीय निवृत्त व्यक्ती आणि त्यांच्या पत्नी ऑगस्ट २०२२ ते २०२५ कालावधीत जवळपास तीन वर्षे चाललेल्या फसवणुकीतून सुमारे ९.७८ लाखाची आर्थिक फसवणूक केली आहे.फिर्यादी वृद्ध व्यक्ती व त्यांची पत्नी सौ. मनाली हे गेल्या काही वर्षांपासून मानसिक तणावाखाली होते. दि. २९ ऑगस्ट २०२२ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत ब्रम्हदत्त इंगळे, शिवलिंग इंगळे, भवानी इंगळे तसेच एक अनोळखी इसम यांनी संगनमत करून फिर्यादी दाम्पत्याशी वारंवार संपर्क साधला. आरोपींनी त्यांच्या घरावर काळी जादू केली असून पिशाच्च सोडले असल्याचे खोटे सांगत भीतीचे वातावरण निर्माण केले.“घरावर संकट आहे, पूजा-विधी केले नाहीत तर मोठे अनर्थ घडतील, मुलीचा मृत्यूही होऊ शकतो,” असे सांगून आरोपींनी विश्वास संपादन केला.

संकट दूर करण्यासाठी कामाख्या देवीला जाऊन विशेष पूजा करावी लागेल, तसेच पूजेसाठी सोन्याचे खिळे वगैरे असे दागिने आणि मोठा खर्च आवश्यक आहे, असे सांगून वेळोवेळी रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेतले.या आमिषाला बळी पडून फिर्यादी दाम्पत्याने आरोपींकडे एकूण ९,७८,१०० रुपये किंमतीची रोख रक्कम व दागिने दिले. मात्र, पूजेनंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने आणि आरोपींच्या मागण्या वाढतच गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक, धमकी देणे तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन (काळी जादू) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही तपास केला जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *