नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था दिल्ली, पंजाब आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. मनालीमध्ये ५२ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना पुढील २४ तास घरात राहण्यास सांगितले आहे.
राज्यातील अनेक नद्या आणि कालवे धोक्याच्या चिन्हावर आहेत. दोन ठिकाणी ढगफुटी झाली आहे. पूर आणि पावसाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत. देशातील एकूण पाऊस आता सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. ९ जुलैपर्यंत सरासरी २३९ मिमी पाऊस झाला होता. आता हा आकडा २४३ मिमी पर्यंत ओलांडला आहे, जो २% अधिक आहे.