मिनी मंत्रालयात काँग्रेसचाच जोर? दोन जिल्हा परिषदांवर कब्जा मिळवत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला कसे डिवचले?
मुंबई विशेष प्रतिनिधी :”राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या विचारांचा आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळाचा नारा दिला होता आणि आजच्या निकालांनी जनतेने काँग्रेसच्या विचारांनाच कौल दिला आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केले. राज्यातील दोन जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आली असून, अन्य दोन ठिकाणी पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. या निवडणुकीत काँग्रेस हा राज्यातील ‘सर्वात मोठा विरोधी पक्ष’ म्हणून समोर आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी महापालिकांच्या सत्तासमीकरणांवरही भाष्य केले. “चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमतासाठी आम्हाला केवळ दोन सदस्यांची गरज असून, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू आहे. परभणीतही शिवसेना (उबाठा) गटाला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज असून, ‘देण्या-घेण्याचे’ हे समीकरण दोन्ही ठिकाणी एकत्रितपणे सुटले,” असे त्यांनी स्पष्ट केले. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता, त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
यावेळी सपकाळ यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत विविध मुद्द्यांवरून घेरले. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला दहा दिवस उलटले तरी अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे लोकांमध्ये संशयाचे वातावरण आहे,” असे ते म्हणाले. सोलापूरच्या मोहोळमध्ये धाब्यावर सापडलेल्या ईव्हीएम मशीनचा उल्लेख करत त्यांनी निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, सीटीईटी परीक्षेवेळी महिला परीक्षार्थींना मंगळसूत्र काढायला लावण्याच्या प्रकाराचा त्यांनी तीव्र निषेध केला. “भाजप आता धर्मबुडवेपणा करू लागला आहे का? कॉपीचा आणि मंगळसूत्राचा काय संबंध?” असा तिखट सवालही त्यांनी यावेळी विचारला.
संघाच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी जे.पी. नड्डा यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत टोला लगावला की, “कुणाला कुणाची गरज आहे हे भाजप आणि संघाने आपसात ठरवावे.” एकंदरीतच, जिल्हा परिषद निकालांनी काँग्रेसला संजीवनी दिली असून आगामी काळात पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
—
Deepak Kaitke




