मुंबई

म्हाडा लोकशाही दिनात १० अर्जांवर सुनावणी

मुंबई : प्रतिनिधी,महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज सोमवारी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात पंधरावा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांच्या एकूण १० अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

दीप्ती दिलीप पितळे यांच्या सासुबाई रुक्मिणी दिनकर पितळे म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत तुंगा पवई गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकेसाठी स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गातून यशस्वी व पात्र अर्जदार ठरल्या. रूक्मिणी दिनकर पितळे यांनी सदर सदनिका नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे आपल्या नातूच्या नावे केली. दरम्यान, सदर बक्षीसपत्र म्हाडामध्ये सादर करण्यापूर्वी दीप्ती पितळे यांच्या मुलाचे अर्थात रुक्मिणी दिनकर पितळे यांच्या नातवाचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे बक्षीस पत्राची ग्राह्यता संपुष्टात आली. सदर सदनिका दीप्ती पितळे व दिलीप पितळे यांच्या नावे हस्तांतरित करावी, या मागणीसाठी आजच्या लोकशाही दिनात दीप्ती दिलीप पितळे यांनी अर्ज केला.

सदर अर्जावर सुनावणी करताना ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी अत्यंत संवेदनशीलपणे, माणुसकी जपत व सकारात्मकतेने या मागणीबाबत विचार करत दीप्ती पितळे यांना त्यांच्या सासूबाई रुक्मिणी दिनकर पितळे या हयात असल्याने नवीन बक्षीस पत्र करून येत्या आठ दिवसात सादर करण्याबाबत सांगितले. दीप्ती पितळे यांनी नवीन बक्षीस पत्र सादर केल्यानंतर सदर बक्षीस पत्र ज्यांच्या नावे केलेले असेल त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.

प्रशांत तोरसकर यांच्या वडिलांच्या नावे सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका आहे. सन २०२० मध्ये तोरसकर यांच्या वडिलांचे निधन झाले. तोरसकर यांच्या वडिलांनी मृत्युपत्रात सदर सदनिका आपला मुलगा प्रशांत तोरसकर यांना हस्तांतरित करण्याबाबत नोंद केलेली होती. सदर मृत्युपत्राचे प्रोबेटही करण्यात आले असून सदर सदनिका हस्तांतरित करण्याबाबत प्रशांत तोरसकर यांनी आज लोकशाही दिनात अर्जाद्वारे केली. सदर अर्जावर सुनावणी करताना ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकरणी तात्काळ उद्या, दि. १० फेब्रुवारी, २०२६ रोजी उद्या सकाळी ११.०० वाजेपर्यंत संबंधित मिळकत व्यवस्थापकांनी कार्यवाही करून सदर सदनिका प्रशांत तोरसकर यांच्या नावे हस्तांतरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सरदार नगर येथील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांकडून आकारलेले वाढीव शुल्क परत करण्याबाबत प्रतापसिंह सावंत यांनी आजच्या लोकशाही दिनामध्ये अर्ज केला होता. सदर प्रकरणाबाबत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या स्तरावर या प्रकरणाबाबत आढावा घेऊन सदर वाढीव शुल्क नियमानुसार आकारले आहे किंवा नाही याबाबत खात्री करण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले. आज सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात मुंबई मंडळाशी संबंधित ८, कोकण मंडळाशी संबंधित १ व मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी संबंधित १ अर्जावर सुनावणी घेण्यात आली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *