टॉप स्टोरी मुंबई

भारताचा स्वाभिमान अमेरिकेच्या चरणी? सचिन पायलट यांनी उघड केला व्यापार करारातील तो ‘धक्कादायक’ व्यवहार!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:देशाचे हित आणि सार्वभौमत्व गहाण ठेवून केलेला कोणताही करार हा प्रगतीचा मार्ग नसून गुलामीची नवी साखळी आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारावर तोफ डागली. “अमेरिकेच्या दबावाखाली झुकून मोदी सरकारने भारतातील अन्नदात्याचा गळा घोटला आहे,” असा घणाघाती हल्ला करत त्यांनी या कराराने भारताची आत्मनिर्भरता धोक्यात आल्याचा दावा केला. १४४ कोटी जनतेच्या भविष्याशी खेळणारा हा करार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या करारातील अटींमुळे महाराष्ट्रासह देशातील कापूस, सोयाबीन, मका आणि फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडणार असल्याचे पायलट यांनी नमूद केले. अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात शुल्कमुक्त प्रवेश देऊन स्वदेशी बाजारपेठ उद्ध्वस्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या मालाला भारतात शून्य टक्के कर, तर भारतीय मालावर १८ टक्के कर लादण्यात आला आहे; हा व्यापार नसून भारतावर केलेला अन्याय आहे, असे ते म्हणाले. रशिया आणि इराणकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने घातलेली बंदी मान्य करणे, हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि सार्वभौमत्वावर मोठे संकट आहे. “पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कधीही अमेरिकेचा दबाव झुगारून कणखर भूमिका घेतली होती, मात्र आजचे नेतृत्व त्यांच्यासमोर लोटांगण घालत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी सचिन पायलट यांनी राजकीय सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मिळणाऱ्या धमक्या आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्याबद्दल केलेले विधान हे अत्यंत खालच्या थराचे राजकारण असल्याचे ते म्हणाले. ज्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे ही लोकशाहीची थट्टा आहे. अमेरिकेला दरवर्षी ५०० अब्ज डॉलरच्या खरेदीची हमी देऊन सरकार नेमकी कोणाची सेवा करत आहे, असा बोचरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेने आता आंतरराष्ट्रीय करारावरून देशात नव्या संघर्षाची ठिणगी टाकली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *