इतिहास बदलला, आता भूगोलही बदलणार! शिवनेरीवर शिवरायांच्या ४०० व्या जयंतीचा ‘मेगा प्लॅन’ जाहीर
पुणे | विशेष प्रतिनिधी:”छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज भारताचा इतिहास आणि भूगोल दोन्ही वेगळे असते,” अशा शब्दांत छत्रपतींच्या जागतिक कर्तृत्वाचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर शिवरायांच्या ४०० व्या जयंतीचा ‘मेगा प्लॅन’ जाहीर केला. सन २०३० मध्ये होणारी ही जयंती केवळ भव्यच नाही, तर जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात केले. विशेष म्हणजे, जगातील २७ देशांच्या संमतीने शिवनेरीसह राज्यातील १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळाल्याचे अधिकृत प्रमाणपत्रही यावेळी सरकारकडे सोपवण्यात आले. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक नकाशावर झळकणार असून, राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
किल्ले शिवनेरीच्या पवित्र भूमीत पार पडलेल्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या सुशासनाची प्रेरणा घेऊन बलशाली महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवकालीन ‘शिवराई’ चलनापासून ते आधुनिक ‘लाडकी बहीण’ योजनेपर्यंत स्त्री-सन्मानाची आणि लोककल्याणाची परंपरा सरकार पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘शिवनेरी विकास आराखड्या’चा उल्लेख करत, शिवजन्मभूमीचे सौंदर्य आणि वारसा जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासित केले. रायगड, तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील स्मारकांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ही स्मारके भावी पिढीला राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक पाळणा गाऊन शिवरायांना अभिवादन करण्यात आले, तर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘शिवनेर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युनेस्कोच्या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे महत्त्व आता सातासमुद्रापार पोहोचले असून, या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार विशेष मोहिमा राबवणार आहे. रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने शिवनेरीचा परिसर जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.




