वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?
‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार गटाने टाकलेल्या ‘ऐक्याच्या’ गुगलीमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. सुनेत्रा वहिनींचा उपमुख्यमंत्रिपदाचा मार्ग रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा’ हा केवळ सापळा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ऐक्याची साद की सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीला ‘ब्रेक’?
प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी निश्चित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा प्रस्ताव देण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी शरद पवार गटाने ‘एकत्र येण्याचे’ वारे सोडल्याने या प्रक्रियेला खीळ बसली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रशासकीय अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सुप्रिया सुळे यांच्या प्रदीर्घ दिल्लीतील अनुभवाचा फायदा पक्षाला व्हावा, असा युक्तिवाद आता जोर धरू लागला आहे. अंकुश काकडे यांनी “अजितदादांना दोन्ही पक्ष एकत्र हवे होते,” असे भावनिक विधान करून सुनेत्रा पवारांच्या समर्थकांपुढे एक मोठे धर्मसंकट उभे केले आहे.
‘पवार’ आडनावाचा संघर्ष आणि शरद पवारांची चाल
लोकसभा निवडणुकीतील गाजलेला ‘इनसायडर विरुद्ध आउटसायडर’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अजितदादांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांच्या हाती जाण्याऐवजी ती ‘मूळ’ पवार असलेल्या सुप्रिया सुळेंकडेच राहावी, यासाठी शरद पवारांनी पडद्यामागून सूत्रे हलवल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव थेट पुढे न आणता ‘ऐक्य’ हा शब्द वापरून, अजितदादांच्या गटातील नेत्यांची आणि आमदारांची मानसिक कोंडी करण्याचा प्रयत्न या रणनीतीतून दिसून येत आहे.
सत्तेच्या चाव्या आणि निष्ठावंतांची कसोटी
सध्याच्या पेचप्रसंगात सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या समर्थकांचे बळ आणि सहानुभूती आहे. पटेल, भुजबळ आणि मुंडे यांसारखे नेते वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मात्र, शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जर पक्षाचे विलीनीकरण झाले, तर अजितदादांच्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल आणि संपूर्ण सत्ता सुप्रिया सुळेंच्या हाती जाईल, अशी भीतीही काही समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
अंतिम फैसला फडणवीसांच्या हातात?
अजित पवारांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार आणि राष्ट्रवादीचे भविष्य काय असेल, याचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. सत्तेच्या या सारीपाटावर सुनेत्रा वहिनी आपला हक्क टिकवून ठेवणार की शरद पवारांच्या ‘ऐक्याच्या’ मास्टरप्लॅनमुळे सुप्रिया सुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या निर्विवाद नेत्या म्हणून समोर येणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
—
Deepak Kaitke




