नवी मुंबई:महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून जाहीर केले व त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला.
महापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जातून नगरसेविका सरोज रोहिदास पाटील यांनी तसेच उपमहापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जातून नगरसेवक आकाश बाळकृष्ण मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौर पदावर सुजाता सुरज पाटील व उपमहापौर पदावर दशरथ सिताराम भगत बिनविरोध निवडून आले. महापौर व उपमहापौर पदाचे स्थानग्रहण केल्यानंतर प्रथमत: सभागृहाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.




