टॉप स्टोरी राजकारण

राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; राज ठाकरेंनाही लगावला सणसणीत टोला!

​विशेष प्रतिनिधी:​”पक्षाचे विलिनीकरण करणे किंवा न करणे, हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. जेव्हा वेळ येईल आणि ते आम्हाला विचारतील, तेव्हाच मी त्यावर भाष्य करेन. आत्ताच कशाला हवेत पतंग उडवता?” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या या गुढ उत्तरामुळे राजकीय वर्तुळात मात्र नव्या चर्चांना उधाण आले आहे.
​मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात विलिनीकरणाबाबत काही ठोस खलबते झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, मात्र तिथल्या राजकीय घडामोडींची सविस्तर माहिती घेऊनच अधिक बोलणे उचित ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
​संघविरोधी ‘दुकानं’ आता बंद होणार!
​मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना आता वाईट वाटणे साहजिक आहे. संघाला १०० वर्षे पूर्ण होत असताना लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालकांनी केवळ मार्गदर्शन केले नाही, तर प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता संघविरोधी प्रचाराची दुकाने बंद होणार असल्याने अनेकांच्या पोटात मळमळ सुरू झाली आहे,” अशा तिखट शब्दांत त्यांनी टीका केली.
​संघाशी संबंध नसलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. “सगळ्यांची असूया फक्त इतकीच आहे की आम्हाला का बोलावले नाही,” असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानांमुळे आगामी काळात राज ठाकरे विरुद्ध भाजप असा नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *