जिभेवर बक्षीस, चहुबाजूंनी घेराव आणि अखेर दिलगिरी; हर्षवर्धन सपकाळांच्या ‘त्या’ विधानाचा शेवट ‘सॉरी’ने का झाला?
विशेष प्रतिनिधी:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात ‘टिपू सुलतान’ नावाचे जे वादळ घोंगावत होते, ते आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका पोस्टने काहीसे शांत होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अखेर मंगळवारी शिवप्रेमींची माफी मागितली आहे. पण ही माफी केवळ नम्रता आहे की वाढत्या दबावाचा परिणाम? या प्रश्नाने आता जोर धरला आहे.
काय होते ते ‘ठिणगी’ टाकणारे विधान?
मालेगावमधील एका फोटोवरून सुरू झालेल्या वादात उडी घेताना हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना महाराजांच्या ‘समकक्ष’ मानले पाहिजे, असे वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला. मग काय? जणू संपूर्ण राज्यच पेटून उठले. भाजपने यावरून सपकाळांना लक्ष्य केले, तर एका आमदाराने चक्क टोकाची भाषा वापरत बक्षीस जाहीर केले. पुण्यात धार्मिक तणाव निर्माण झाला आणि सोशल मीडियावर संतापाचा लाट उसळली.
“भाजपच्या पिलावळीने खेळला डाव!”
सपकाळ यांनी आपली चूक मान्य करण्यापेक्षा भाजपवरच पलटवार केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “मी जे बोललोच नाही, ते माझ्या तोंडी घालण्यात आले. भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. माझ्या विधानाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला.” त्यांच्या मते, समाजात दंगली घडवण्यासाठी हा नियोजित अपप्रचार होता.
संविधानाचा दाखला आणि महाराजांची भक्ती
आपल्या बचावात सपकाळ पुढे म्हणतात की, “छत्रपती शिवराय हेच माझे आदर्श आणि स्वाभिमान आहेत, त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. टिपू सुलतानांनी महाराजांकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, इतकाच माझा मुद्दा होता. संविधानातही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. समाजात जात-धर्मावरून ध्रुवीकरण होऊ नये, हीच माझी प्रामाणिक भूमिका होती.”
अखेर, “कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता,” असे म्हणत सपकाळांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या दिलगिरीनंतर राजकीय वातावरण खरोखर निवळणार की ‘तुलने’चा हा मुद्दा आगामी निवडणुकीत पुन्हा उफाळून येणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.




